तुळजापूर , दि . १८
तुळजापूर - लातूर महामार्गावर असणाऱ्या काक्रंबा गावासमोर महामार्ग रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने हा भाग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. चुकीच्या ठिकाणी पुलाचे काम केल्याने त्याचा भविष्यात काक्रंबासह १४ गावच्या ग्रामस्थांना नाहकच त्रास सहन करावा लागणार आहे. पुल गावासमोर करून महामार्गरस्ता तात्काळ सुरु करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
तुळजापूर - लातूर रस्त्यावर तीर्थक्षेत्र तुळजापूरपासून ६ कि.मी अंतरावर काक्रंबा हे गाव आहे. गावची लोकसंख्या ११ हजार असून, या गावाशी आसपासच्या १४ गावांचा संपर्क येतो. त्यामुळे येथील पुलाचे काम गावासमोर करणे गरजेचे असताना पुढे केले आहे. तसेच पुलाची उंची कमी असल्याने त्याखालून ट्रॅक्टर व इतर वाहने जात नाहीत. हा पूल गावापासून दूर असल्याने कटपाइंटच्या दोन्ही बाजु तीन-तीन किलोमीटर अंतरावर असल्याने इकडून तिकडे जाताना ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी पुढे झालेल्या पुलाला विरोध केला असून संबंधित मंडळी गावाजवळ करतो असे तोंडी आश्वासन देत आहेत. सध्या काम दोन वर्षांपासून बंद असून ठेकेदारांने गाशा गुंडाळून गेला आहे. या रखडलेल्या रस्त्यावर आजपर्यंत सर्वाधिक अपघात झलेले आहेत. या गावातील महामार्ग रस्ता कामात बारा शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या आहेत. यातील काही शेतकऱ्यांना अद्यापही मावेजा दिला गेला नाही. पूल चुकिच्या ठिकाणी झाल्याने गाव दोन भागात विभागले जाणार आहे.
शाळा, महाविद्यालय एका भागात तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत इमारत दुसऱ्या भागात आहे. त्यामुळे गैरसोयीच्या ठिकाणी केले जाणारे पुलकाम थांबवून ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणी म्हणजे गावासमोरील रस्त्यावर करण्याची मागणी होत आहे.
चेतन बंडगर , शिवसेना सोशल मीडिया तुळजापूर तालुकाप्रमुख
काक्रंबा गावाजवळ पूल होणे गरजेच असताना तो पुढे चुकीच्या ठिकाणी केल्याने काम झाल्यास गाव दोन भागात विभागणार आहे. तसेच पुलाखालील भागाची उंची कमी केल्याने त्याखालून ट्रॅक्टरसह अन्य मोठी चाहने जात नाहीत.याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने पुल गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी करणे गरजेचे आहे.यासाठी पाठपुरावा सुरु आहे.