तुळजापूर ,दि . १७
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय दुखवटयातून मागार घेणार नाही. तो पर्यंत विलीनीकरणाचा लढा सुरुच राहील असा एल्गार महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सलगरा दिवटी ता. तुळजापूर येथे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.
संपातील कर्मचारी कामावर उपस्थीत रहावे या साठी महामंडळाचे अधिकारी सध्या कर्मचाऱ्यांच्या दारोदार फिरत आहेत, सलगरा व परिसरातील गावात एस टी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने अधिकाऱ्यांनी येथे जावून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सुचना केली. मात्र कर्मचाऱ्यांनी आम्ही दुखवटयात आहोत, काम करण्याची आमची मानसिकता नाही, तसेच विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही कामावर येणार नाही, आन्याय कारक असा एम आर टी यू ॲक्ट नुसार कुठलीही कारवाई केली जाणार नाही या बाबत लेखी देण्याची मागणी अधिकाऱ्याकडे केली. कर्मचाऱ्यांच्या या भूमीकेवर अधिकारी यांनी माघार घेत तेथून काढता पाय घेतला. याच पार्श्वभूमीवर रविवार दि. १६ जानेवारी २०२२ रोजी सलगरा दिवटी येथे सकाळी अकरा वाजता सर्व एस टी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास सलगरा, वानेगाव, हिप्परगा, किलज, होर्टी, लोहारा येथील एस टी कामगार मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी नागनाथ मसुते, गुरुनाथ पडवळ, खंडू पाटील, सुनील डांगे, अमोल लोमटे आदीनी मेळाव्यातील उपस्थीत कामगारांना मार्गदर्शन करुन विलीनीकरणा शिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी एस टी महामंडळाचे कर्मचारी शिवशंकर कांबळे, शिवाजी नकाते, तुकाराम घोडके, राजेंद्र भरगंडे, नामदेव भरगंडे, अमीत जाधव, संभाजी कदम यांच्यासह कर्मचारी उपस्थीत होते.