मंगरूळ , दि . ५


सध्याच्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आरोग्यावर परिणाम होत असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करून विषमुक्त व शून्य बजेट शेतीकडे वळावे असे आवाहन प्रा.ए.एन.जाधव यांनी केले.


कृषी विज्ञान केंद्र व वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या मंगरूळ येथील भुजंगराव घुगे स्मृती सभागृहात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.  प्रारंभी वृक्षाला पाणी  व आलेल्या मान्यवरांचे तुळशी हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रा.ए.एन.जाधव,डॅा.भगवान अरबाड, श्रीमती अपेक्षा कसबे,श्री.अनील घुगे,डॅा.श्रीकृष्ण झगडे यांची उपस्थिती होती.


डॉ.अरबाड  प्रास्ताविकात म्हणाले की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती,शेळी पालन,गांडूळ खत, असे अनेक उपक्रम राबवले जातात याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.श्रीमती अपेक्षा कसबे यांनी वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बियाणांची माहिती दिली व आलेल्या शेतकऱ्यांना पेरणी संदर्भातील विषयावर बोलते केले,डॉ.श्रीकृष्ण झगडे यांनी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचे संरक्षण कसे करावे,आळीचा प्रादुर्भाव व त्यावरील उपाय,पिकावरील रोगाचे व्यवस्थापन यावर माहिती दिली.

यावेळी सेंद्रिय शेतीचे सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कृषी सखी व लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच यशस्वी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट व शेतकरी उत्पादक गटाची स्थापना करण्याचे नियोजन वात्सल्यच्या माध्यमातून करण्याचे ठरले.
या प्रसंगी कोरेवाडी,मंगरूळ,
खंडाळकरवाडी, काळेगाव,सरडेवाडी,कसई,
यमगरवाडी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
Top