जळगाव , दि . ०४ : अशोकराव चव्हाण
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ,कल्याण संचालित
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद सन २०२० पासून आपण विश्व अहिरानी संम्मेलन भरवायला सुरवात केली आहे. जेष्ठ अहिरानी लेखक व खान्देशचे इतिहास, संस्कृती, संशोधक बापूसाहेब हटकर यांच्या अध्यक्षतेखाली २०२० मध्ये ऑनलाईन भरविण्यात आलेल्या पहिल्या विश्व अहिरानी संमेलनात भारतासह २७ देशातील अहिर बांधवांनी भाग घेतला होता. त्यात नवे जुने अहिरानी साहित्य, लोकगीत, कथाकथन, कविता, गझल सादर करण्यात आल्या. तसेच खान्देशातील लोककला, संगीत, नृत्य, खाद्य संस्कृतीसह पर्यटन स्थळ, जल, जंगल, जमीन यावर उहापोह करण्यात आला. त्या कान्हदेश आणि कान्हदेशा बाहेरील अनेक मान्यवरांनी भाग घेतला.
या विश्व अहिरानी संमेलनाचे मुख्य फलित म्हणजे २ कोटी अहिराणी भाषिक लोकांच्या या समृद्ध भाषेची भारतीय भाषा विज्ञान भवन बंगलोर आणि युनोस्कोने सर्वात प्रथम दखल घेतली . अहिरानी भाषेला इंडो-आर्यन भाषेचा दर्जा देण्यात आला. तसे पत्र युनोस्कोने संघटनेकडे पाठविले आहे. या कामी भाषा तज्ज्ञ पद्मश्री गणेशदेवी यांचे मार्गदर्शन आणि मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.
आता आपल्याला अहिरानी भाषेला. ८ व्या परिशिष्टात समाविष्ट करून ती अभ्यासक्रमात आणावी , जनगणनेत स्थान मीळावे ही काम आपल्याला करायची आहेत. हे आणि असे अनेक प्रश्न घेऊन आपल्याला हे आंदोलन पुढे न्यायचे आहे. त्याचा नियमित भाग म्हणजे दर वर्षी विश्व अहिरानी संमेलन भरविण्याचा संकल्प आपण करीत आहोत. त्यानुसार आता आपण २२,२३,२४ जानेवारी २०२२ ला दुसरे अहिरानी संमेलन घ्यायचे ठरवले आहे. ओमीक्राॅनच्या संकटावर मात करत लॉकडाउनच्या काळात कुटुंबातील सर्व सदस्यांसह साहित्यिकांच्या विचारधनाचा लाभ घेता येणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून खान्देशी गतवैभव गत इतिहास उलगडला जाणार आहे. या स्तुत्य आणि अभिनव उपक्रमासाठी आपण आपला वेळ व तन मन धना सह सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विकास पाटील यांनी केले आहे..
यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते संजय वाघ यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नुकतीच नाशिक येथे बैठक घेण्यात आली. यावेळी जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे प्रथम विश्व अहिरानी संमेलनाचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर, खजिनदार आप्पासाहेब ए. जी. पाटील, विनोद शेलकर, सुभाष सरोदे, अनिरुध्द चव्हाण अहिरानी भाषा संवर्धन परिषदेचे सहकार्याध्यक्ष डॉ. एस. के. पाटील, एम.के. भामरे , डॉ. फुला बागुल, मानसी पाटील, मेघा पाटील, सुनीता पाटील, अमोल पाटील, यासह अनेक मान्यवर साहित्यिक व सर्व विभाग अध्यक्ष मगन सूर्यवंशी, एन एच महाजन, विनायक पवार, डॉ. दौलत सोनवणे, प्रशांत पाटील, सुधाकर शिसोदे, शंकर पाटील, अशोक पाटील, कैलास पाटील, सीताराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिरानी भाषा म्हणजे सर्व भाषांची महाराणी ... अहिरांची मातृभाषा... अहीर प्रदेशाची अर्थात कान्हदेशची (खान्देशची) सुसंवादाची, संपर्काची देवाण घेवाणीची आणि व्यवहाराची बोलीभाषा... कान्हदेशी (खान्देशी) बोली भाषेचा दर्जा , रूबाब, सौंदर्य, ठसका , महती, महिमा , गरिमा काय वर्णावा ? तिचा बाज न्याराच अहिरानी भाषेचं शब्द माहत्म्य , शब्द सौंदर्य आणी शब्दसामर्थ्य विलक्षण मनोहारी आहे.
अहिरानी भाषा ही उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि लगतच्या सीमावर्ती गुजरात, मध्य प्रदेश, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या मूळ गवळी लोक ही अहिराणी भाषा मोठ्या प्रमाणात बोलतात. जगभरात नोकरी, व्यवसाय, उद्योग व्यापार निमित्त देश-विदेशात, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदाबाद, सूरत, वापी, सिलवासा इत्यादी ठिकाणी स्थलांतरित झालेल्या कान्हदेशी बंधू-भगिनींनी अहिरानी भाषेची शब्द संस्कृती, शब्दवैभव, शब्दसंपदा, शब्द सामर्थ्य, शब्द माधुर्य, शब्द श्रीमंती, यात्रा, जत्रा, रूढी-परंपरा, कला, क्रीडा, साहित्य, खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार नेली.
ऑनलाइन अहिरानी संमेलनाच्या निमित्ताने अहिरानी भाषेचा सर्वत्र अर्थात तळागाळातील जनसामान्यांमध्ये जनजागृती प्रसार, प्रचार करणे. तसेच अहिरानी भाषेचे संवर्धन, संक्रमण, संबोधन आणि संशोधनाची दालने खुली करणे. अहिरानी भाषेची अभिरुची, आवड व गोडी निर्माण करणे हा त्रिस्तरीय मूळ उद्देश आहे . ऑनलाईन विश्व अहिरानी संमेलन म्हणजे अहिरानी भाषेचा विकास, उन्नती, समृद्धीसाठी परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, मुलाखत, कथाकथन, कविता, गझल, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, संस्कृती , पर्यटन इत्यादींच्या माध्यमातून, चिंतनातून, विचारमंथनातून व सादरीकरणातून सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या आणि देशविदेशातील नामवंत साहित्यिकांना भेटण्याची सदाबहार व रंगतदार कार्यक्रमाची जणू रेलचेल असणार आहे . रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी तर ही आनंदाची , उत्साहाची , उधानाची जणू पर्वणीच ठरेल आणि सरस्वतीच्या समर्पित साधकांशी सुसंवाद व संपर्क साधण्याची त्यांचे अनुभवाचे बोल नवविचार प्रवाह व चतुरस्र मार्गदर्शनाचा निखळ, नितळ आणि निर्मळ विचारांचा आस्वाद घेण्याची जणू अपूर्व मनोरंजन ठरेल यात तिळमात्र शंका नाही. जगभरातील साहित्यिकांची, लेखकाची, कविंची, दिग्गजांची, विद्वानांची, विचारवंतांची, अभ्यासकांची, प्रवर्तकांची आणि भाषाप्रेमी रसीक प्रेक्षकांची जणू मांदियाळी ठरणार आहे. जगभरातील कान्हदेशी बांधवांना एकत्र आणणारे हे एक खुलं व्यासपिठ आहे.
अहिरानी संमेलना प्रसंगी अहिरानी भाषेतील गुजर , लेवा, भिलाऊ, आदिवासी व ग्रामीण बोली भाषेत लेख, निबंध, साहित्य , कविता, चारोळ्या, वात्रटिका, विनोद , विडंबन व इतर साहित्य प्रकार ई-बुकच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा मानस आहे . नवलेखकांनी नवनवीन विषयांवर व्यक्त व्हा, लिहितो व्हा, बोलतो व्हा . लक्षात ठेवा भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच देश टिकेल. जात, धर्म , पंथ, पक्ष , पद, प्रतिष्ठा व पैसा विसरून तनमनधनाने योगदान देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची, अखंड एकजूटीची आणि सर्वांना एकत्र येण्याची गरजेचे आहे . साहित्यिक , लेखक , कवी विचारवंत , ज्ञानवंत, राजकारणी, समाजकारणी , सूत्रधार , सल्लागार, दानशूर , मार्गदर्शक , सुत्रसंचलक, भाषातज्ज्ञ, तंत्रज्ञ , दिग्दर्शक, नाटककार , कलाकार, नृत्यकार, संगीतकार, शिल्पकार, चित्रकार , पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर , इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया प्रतिनिधी, स्वयंसेवक , मंडळ , संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी. या सर्वांना रुचेल, पचेल , आवडेल , झेपेल अशा पध्दतीने आपापली भूमिका व जबाबदारी कर्तव्यभावनेने समर्थपणे व सक्षमपणे पार पाडण्यासाठी एकत्र येऊन न भूतो न भविष्यती अस सुंदर , सुरेख अन संस्मरणीय असं संमेलन सात समुद्रापलीकडे सीमोल्लंघन करील. असा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन या बैठकीद्वारे करण्यात आले आहे बैठकीस ८० अहिरणीवर प्रेम करणारी व्यक्तिमत्त्व या विश्व अहिराणी संमेलनाच्या ध्वजा आपल्या हातात घेऊन दाही दिशांना याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जमलेली होती. या संपूर्ण सभेचे माननीय, आदरणीय प्रशांत पाटील व अंबिका विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील तसेच सर्व मराठा पाटील मंडळाचे पदाधिकारी यांनी दुसरे विश्व आयराणी संमेलन २०२२ याच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेचे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन, आयोजन, व्यवस्थापन केले होते.