नळदुर्ग ,दि . २२ :
नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय चालू व्हावे अशी मागणी जनतेतून सातत्याने होत आहे. यासाठी विविध संघटना पाठपुरावा करत होत्या. तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने वेळोवेळी उपजिल्हा रुग्णालय सुरु व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. वारंवार प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच या रुग्णालयासाठी जेव्हा जेव्हा निधीची कमतरता भासायची त्यावेळी त्यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला.
नळदुर्ग हे महामार्गावर वसलेलं गाव आहे. येथे अनेक खेड्यांचा संपर्क आहे . येथे वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे हे उपजिल्हा रुग्णालय लवकर सुरू झाले पाहिजे ही मागणी केली असता 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन संबंधित प्रशासनाने दिले होते. पण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा प्रशासनाने दिरंगाई केली आहे. वास्तविक पाहता येथील रुग्णालय सुरू होणे गरजेचे असताना केवळ कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रतिकात्मक उद्घाटन करून प्रशासनाच्या या दिरंगाईचा निषेध व्यक्त केला. तसेच नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करून येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून घ्यावे ही मागणी करत आंदोलन करण्यात आले व येत्या 26 जानेवारी पर्यंत उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू नाही केले तर भाजपच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक आलूरे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष नारायण नन्नवरे, भाजप नेते सचिन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, नळदुर्ग भाजप शहराध्यक्ष धिमाजी घुगे, राहुल कुलकर्णी, दयानंद मुडके, शहर भाजपचे सरचिटणीस सागर हजारे, सुजित सुरवसे, रियाज शेख, अजय देशपांडे, युवा वारीयर्सचे मुदस्सर शेख, योगेश सुरवसे , सोनू बनसोडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.