तुळजापूर , दि . २२ : राजगुरू साखरे 


यंदा उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबा पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे, सध्या आंब्याला मोहोर येण्याचा काळ आहे. मात्र ढगाळ वातावरण अवेळी पाऊस, अल्प प्रमाणात थंडी, या वातावरणातील बदलाचा परिणाम येथील आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. 



गेले काही दिवस लांबलेली थंडी आणि सुरू झालेले ढगाळ वातावरण याचा परिणाम आंब्यावर होऊ लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर या कालावधीत आंब्याच्या झाडाला मोहोर येतो. परंतु यावर्षी सतत बदलते वातावरण, अतिवृष्टी ढगाळ वातावरण, दाट धुके, अवकाळी पाऊस, व सम प्रमाणात थंडीचा अभाव आदी कारणांमुळे देशी व कलमी आंब्याच्या झाडांना अद्यापही  मोहोर फुटुन येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली असून  गावरान आंब्यासह कलमी आंब्यालाही अद्याप मोहर न लागल्याने  आमरसाची हौस विकतचे आंब्यावर भागवावी लागणार आहे व आंब्याचा रस खाणे सीझनमध्ये सर्वसामान्यांसाठी महाग होण्याची चिन्हे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 


काही ठिकाणी अल्प प्रमाणात झाडांना मोहोर फुटला आहे तो सुद्धा खूप कमी प्रमाणात आहे, यावर्षी सुमारे 65 ते 70 टक्के इतक्‍या झाडांना मोहोर फुटला नाही, जरी उशिराने मोहोर फुटला तर त्यावर तुडतुडे, मीजमाशी, मोहोर गळणे व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. याकरिता महागडी औषधे फवारण्याचा भुदुंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, एकंदरीत वातावरणातील बदलामुळे आंब्याला उशिरा मोहोर व पाहिजे त्या प्रमाणात फळधारणा होत नसल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
 
Top