काटी , दि . २४ 

आठवड्याला मजुरी देण्याचे आश्वासन देऊन अर्धेच पैसे हातात टेकवत काम पूर्ण झाल्यानंतरही  संपूर्ण मजुरी देण्यास येथील प्रोझिल  इंजिनिअरिंग  कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार तुळजापूर तालुक्यातील मजुरांनी केली आहे.  या कंपनीच्या माळुंब्रा येथील प्रकल्पात पन्नास मजूर काम करत होते.

मजुरांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रोझिल इन्फ्रा इंजिनिअरिंगच्या माळुंब्रा  ता . तुळजापूर येथील शाखेत 50 मजूर वेगवेगळी कामे करत होते. कामावर घेत असताना दर आठवड्याला पैसे देण्यात येतील असे कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकाने सांगितले होते. मात्र दर आठवड्याला मजुरीच्या निम्मीच रक्कम देण्यात येत होती. मागणी केल्यानंतर पुढील आठवड्यात देऊ, काम पूर्ण झाल्याशिवाय उर्वरित मजुरी देणार नाही, असे सांगत काम पूर्ण करून घेण्यात आले. त्यानंतर मात्र सतत टाळाटाळ करत काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीने गाशा गुंडाळला. त्यामुळे या मजुरांची रक्कम अडकली आहे. कर्जाचे हप्ते व कौटुंबीक गरजांसाठी पैसे नसल्यामुळे या मजुरांनी कंपनीला तक्रारी अर्ज देऊन चार दिवसात रक्कम द्यावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.  याप्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवु शकला नाही.


या तक्रारी अर्जावर शहाजी बुबा कसबे, सागर ढगे, विकास सोलंकर, नितीन शिंदे, हनुमंत करडे, राजेंद्र शेंडगे, गणेश राऊत, शाहु वडवराव, योगेश कसबे, हनुमंत सरडे, शहाजी कसबे आदींची स्वाक्षरी आहे
 
Top