उस्मानाबाद , दि .३
गावच्या विकासासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांचा समन्वय खूप महत्त्वाचा आहे समन्वयातूनच गावचा विकास जलद गतीने होतो असे मत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
2018 -19,2019- 20 आणि 2020-2021 या तीन वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 पंचायत समिती अंतर्गतआदर्श ग्रामसेवक म्हणून 24 जणांची निवड करण्यात आली होती. 2 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या,राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामस्तरावर राबविण्याचे ग्रामसेवकांचे योगदान मोठे आहे. आदर्श ग्रामसेवक यांचा सपत्नीक सत्कार व्हावा यासाठी आपण आग्रही होतो आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचे समाधान आहे असे मत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ग्रामसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करताना गावासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्याबरोबरच आरोग्याची देखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे.ग्रामपंचायतीअंतर्गत कर वसुली,माझा गाव सुंदर गाव,माझी वसुंधरा अभियान यासारखे शासनाचे उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन यावेळी ग्रामसेवकांना केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष अस्मिता कांबळे म्हणाल्या, जनता आणि प्रशासन या मधील ग्रामसेवक महत्त्वाचा दुवा आहे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणार या ग्रामसेवकांचा सत्कार होणे आवश्यक आहे.सरपंच आणि ग्रामसेवक यांनी समन्वय साधून काम केल्यास निश्चितच गावचा विकास जलद गतीने होतो. असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी यावेळी गाव पातळीवरील विकास संदर्भात आपली भूमिका मांडली पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमा मागची भूमिका विशद केली.प्रमोद कांबळे, श्रीमती डोईफोडे,गरुड वाडकर,हुंबे,पंडागळे,रईस हजारे,राऊत,निलोफर यांच्यासह भांडार विभागाचे कांबळे आणि चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
भाग्यश्री देवकर यांनी सूत्रसंचालन तर एच. व्ही.कुलकर्णी यांनी आभार मानले. Covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता,जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करून मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.