जळकोट, दि.६ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे लोकसहभागातून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाला वेग आला असून मंदिराचे शिखराचे काम सध्या सुरू आहे. जळकोट गावच्या वैभवात भर टाकणारे मंदिर
सध्या साकारले जात आहे.
जळकोट येथे शिवाजी चौकातील ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या बाजूला लोकसहभागातून श्री .विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधण्याचा संकल्प गावकऱ्यांच्यावतीने घेण्यात आला. कोरोना परिस्थितीच्या अगोदर या मंदिराचे काम हाती घेण्यात आले. यासाठी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या देखरेखीखाली सध्या मंदिराचे काम होत आहे. कोविड महामारीच्या संकटामुळे मंदिराचे बांधकाम दोन वर्ष बंद होते. परंतू संकट हळूहळू निवळल्यानंतर गेल्या सहा-सात महिन्यापासून मंदिराच्या कामाला वेग आला आहे.
मंदिर गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले असून सध्या शिखराचे काम हाती घेण्यात आले आहे. जळकोट व परिसरात प्रथमच असे भव्य मंदिर साकारले जात आहे. यासाठी गावकरी व विठ्ठल भक्त सढळ हाताने देणगी देऊन मंदिराच्या बांधकामात सहभाग घेत आहेत.
जळकोट येथील शिवाजी चौकात गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आयोजित करण्यात येतो. या सप्ताहातूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिराची संकल्पना पुढे आली. आतापर्यंत जवळपास २८ ते ३० लाख रुपये खर्च आला असून, हा संपूर्ण खर्च लोकसहभागातून करण्यात आला आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी जवळपास चाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार सध्या नियोजन करण्यात येत आहे. हे मंदिर साकार झाल्यानंतर गावच्या वैभवात भर पडणार आहे. मंदिर बांधकामाच्या कामात आपलाही हातभार लागावा. यासाठी गावकरी यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केले आहे.