जळकोट, दि.२० : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे ज्याची साक्षात पवनपुत्र हनुमानाचे रूप मानले जाते. अशा वानराचे रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबई - हैदराबाद महामार्गावरील जळकोट नजीकच्या ओढ्यावरील पुलावरून उडी मारताना वानराचा कारच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरताच गावकऱ्यांच्यावतीने मृत वानराची वाजत -गाजत अंत्ययात्रेची मिरवणूक काढून गावातील हनुमान मंदिरासमोर अंतिम संस्कार करण्यात आले.
जळकोट (ता. तुळजापूर ) येथील मुंबई हैद्राबाद- महामार्गावर गावच्या नजीक असलेल्या ओढ्याच्या पुलावरून उडी मारताना वानराचा कारच्या धक्क्याने रविवार रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरताच मृत वानराला ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. या अंतिम दर्शनप्रसंगी गावकर्यांनी व हनुमान भक्तांनी अंतिम संस्कारासाठी दान टाकले. त्यानंतर वाजत -गाजत वानराची मिरवणूक काढण्यात आली. या अंतिम संस्कार मिरवणुकीत अनेक जण सहभागी झाले होते. मोठ्या भक्तिमय वातावरणात वानराला निरोप देण्यासाठी हनुमान भक्त सहभागी झाले होते. पवनपुत्र हनुमान की जय , बजरंग बली की जय , अशा गर्जनांनी वातावरण दुमदुमून गेले होते. गावच्या जुन्या हनुमान मंदिरासमोर अंतिम संस्कार करण्यात आले.