चिवरी , दि . १६ : राजगुरू साखरे
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यानी खरीप पिकासाठी सन २०२१ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरून देखील हजारो शेतकऱ्यांच्या अद्यापही खात्यावर पीक विमा जमा न झाल्याने विमा कंपनीच्या अनागोंदी कारभारविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपतीमुळे पिकांचे झालेले नुकसान भरपाई देण्यासाठी योजना राबवली जाते. गतवर्षी सप्टेंबर , आक्टोंबर या खरीप हंगाममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन या मुख्य पिकासंह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सर्वश्रुत आहे. सात महीने उलटून जात आहेत. तरीही शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या पीक विम्याची रक्कम कोणाच्या घशात घालणार ? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांनी पिकांचे नुसकान झाल्यावर वेळेत कंपंनीकडे ऑनलाइन दावा करूनही शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे . परंतु विमा कंपनीकडून केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना पाच महिन्यापूर्वीच विमा देण्यात आल्याचे समजते, त्यामुळे उर्वरित शेतकरी अद्यापही पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
खरीप हंगाम हातून गेल्यामुळे सोयबिन पिकांसह ,उडीद ,मूग,तूर ,आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुसकान झाले होते. आता रब्बी हंगामातसुद्धा सातत्याने बदलत्या हवामानामुळे धुक्यामुळे ,ज्वारी,हरभरा पिकांचे नुकसान होत आहे यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमानात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पिकावर केलेला खर्च ही निघणे कठिण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक बोज्याखाली दाबला जाऊ लागला आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे तोट्याची शेती सहन करावी लागत आहे. जगाचा पोशिंदा कृषिप्रधान देश शेतकरी राजा अशा मोठमोठ्या उपमा शेतकऱ्यांना दिल्या जातात मग कृषिप्रधान देशात शेतकर्यांची हेळसांड कायम सुरू ठेवायची का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून होत आहे.
एकंदरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सलग दोन वर्षे संबंधित पिक विमा कंपनीकडून ससेहोलपट होत आहे. त्याच बरोबर सांग 2020 च्या पीक विम्याचा प्रश्न तर गुलदस्त्यातच आहे, त्यामुळे हा पिक विमा मिळणार की नाही? असा प्रश्न सध्या शेतकर्यांना पडला आहे, त्यामुळे संबंधित विमा कंपनीने सलग दोन वर्षापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ विमा वाटप करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे