चिवरी , दि . २३ : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेत शेकडो भाविकांनी दंडवत घेतला, यावेळी आराधी, वाघ्या, मुरळी पोतराज गीताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.यंदाही कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करीत यात्रेची बुधवारी  दि.२३ रोजी धार्मिक कार्यक्रमांनी सांगता झाली.



 दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले होते. यात्रेनिमित्त सोमवार व मंगळवार च्या मध्यरात्री १२:३० वाजता देवीचा अभिषेक व महापूजा आरती करण्यात आली. यानंतर गाव ते मंदिर या एक किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडण्यात आला. यामध्ये गावातील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला होता. यानंतर सकाळी आंबट भाताची दुरडी वाजत गाजत पोतराज ,आराधी, जान्या मुरळ्या यांच्यासह बनसोडे यांच्या घरी पोहोच करण्यात आली. मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील ,मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगड्यात भात झेलणे यासह मानपानाची विधी पार पडले. यानंतर रात्री दहा वाजता होमामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला, रात्री बारा वाजता आताषबाजी हलगीच्या वाद्यांसह महालक्ष्मीची‌ पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दि,२३ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पान आणि लिंबू यांचा घाव घेण्याचा कार्यक्रम झाला, यानंतर पालखी मानाच्या पुजाऱ्याच्या घरी प्रस्थान करण्यात आली. यात्रेनिमित्त मंदिरापासून ते स्नानगृहापर्यत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

महालक्ष्मीच्या यात्रेला ' कायरं याञा ' या नावानेही ओळखले जाते. तसेच देवस्थान ट्रस्टच्यावतीने, पुजारी मंडळ  ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेकरूंसाठी सर्व सोयी करण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी नळदुर्ग  पोलीस स्टेशनचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता . 


दरम्यान मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यात्रेमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटाने एकमेकांना तलवारी, दगड ,काठ्यांनी मारहाण केली. या अचानक झालेल्या भांडणामुळे यात्रेतल्या भाविक रानावनातून सैरभैर पळत सुटले , यावेळी पोलीस बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्यात आले. या घटनेमुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 
Top