नळदुर्ग , दि . २६: विलास येडगे

 नळदुर्ग येथील प्राचिन, पवित्र व श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथील ध्यान मंदिराचे रंगकाम व रामतीर्थ ट्रस्ट कार्यालयाचे रंगकाम तसेच पी. व्ही. सी. सिलिंग काम नळदुर्ग येथील रामभक्त डॉ. सत्यजीत डुकरे यांच्यावतीने तर रामतीर्थ येथील महादेव मंदिरात मार्बल फरशीचे काम रामभक्त मनिषसिंह हजारे यांच्यावतीने करण्यात येत आहे.
         

नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ अतीशय प्राचिन व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे. श्री प्रभु रामचंद्र याठिकाणी दोन वेळेस येऊन गेल्याचा उल्लेख इतिहासात आहे. याठिकाणी दररोज श्री प्रभु रामचंद्रांची पूजाअर्चा केली जाते. दर शनिवारी श्री मारुतीरायांची महाआरती तसेच हनुमान चालीसाचे पठण याठिकाणी केले जाते. या महाआरतीस शहरांतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना याठिकाणी महाप्रसाद दिला जातो. या महाआरतीसाठी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे यासाठी  विष्णु महाराज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन डुकरे, प्रभाकर घोडके, श्रीकांत  पोतदार,  ॲड. धनंजय धरणे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला आज यश येतांना दिसत आहे.
        

या मंदिरात असणाऱ्या ध्यान मंदिराचे रंगकाम व रामतीर्थ मंदिर कार्यालयाचे रंगकाम तसेच पी. व्ही. सी. सिलिंग काम नळदुर्गचे सुपुत्र व मुरूम येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले डॉ. सत्यजीत डुकरे हे करून देत आहेत. तर याठिकाणी असणाऱ्या महादेव मंदिरात मार्बल फरशीचे काम नळदुर्ग शहरांतील तरुण उद्योजक मनिषसिंह हजारे यांच्या वतीने करण्यात येत आहे. नळदुर्ग शहरांतील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातुन नळदुर्ग शहरांतील प्राचिन मंदिरांचा जीर्णोद्धार होत आहे. ही नळदुर्गकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या दोन्ही रामभक्तांचे श्री रामतीर्थ देवस्थान ट्रस्टने अभिनंदन केले आहे.


 
Top