मुरूम, ता. उमरगा, दि. १०
उमरगा तालुक्यातील मुरूम शिवारातील जुन्या मुरूम ते आलूर शेतरस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करून रस्ता कामाला सुरुवात केली आहे.
सदरील रस्ता हा पाणंदीतून असल्याने व यामध्ये झाडेझुडपे मोठयाप्रमाणात वाढल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. शिवाय पावसाळ्यात यातून मार्ग काढताना शेतकऱ्यांना मोठया समस्याला तोंड द्यावे लागत होते. मागील २५ वर्षांपासून या शिवारातील शेतकरी रस्त्या अभावी नाहक त्रास सहन करत होते. शेवटी या शिवारातील शेतकरी वर्गणी जमवून स्वखर्चाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. बेंनितुरा नदीपासून जवळपास ४ किलोमीटर अंतरापर्यंत असून आता पर्यंत साडे तीन किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे.
सदर रस्त्याचे काम होत असल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदर रस्ता कामाच्या ठिकाणी गुरुवारी (ता. १०) रोजी मुरूम सज्जाचे तलाठी सुरेश खरात, कोतवाल सतीश जाधव यांनी भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतरस्त्याच्या कामासाठी शेतकरी विष्णू वाघ, शंकर टेकाळे, अण्णासाहेब जोशी, ज्ञानेश्वर चौधरी, देवानंद बिराजदार, प्रकाश कदम,
पंडित मडोळे, विशाल चौधरी, कालीदास चौधरी, महादेव चौधरी, संजीव टेकाळे, प्रशांत चौधरी, सतीश चौधरी, मल्लिकार्जुन स्वामी, बसवराज ख्याडे आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करत आहेत.