मस्सा येथील महामार्गावर राष्ट्रवादीचे सोमवारी रास्ता रोको आंदोलन
शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावरील 40 कोटीचा बोजा कमी करण्याची मागणी


उस्मानाबाद , दि . ०३  


कळंब तालुक्यातील मस्सा (खं), हसेगाव (के), व येरमाळा येथील शेतकर्‍यांच्या शेतातील उत्खनन केलेले नसताना त्यांच्या सातबार्‍यावर 40 कोटीपेक्षा जास्त उत्खनन दंड म्हणून केलेल्या बोजाची नोंद त्वरीत रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.7) सकाळी 9 वाजता कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथील शेगांव-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे  निवेदन  जिल्हाधिकारी यांना बुधवारी (दि.2)  देण्यात आले आहे.



या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, खामगांव-पंढरपूर महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गामुळे अनेकांचा प्रवास सुखकर होणार आहे. सदर काम मेघा इंजिनिअरींग कंपनी करत आहे. कंपनीने तालुक्यातील मस्सा (खं), हसेगांव (के) व येरमाळा येथील काही सर्व्हे नंबर मधून गौण खनिज उत्खनन केलेले आहे. याप्रकरणी तत्कालीन तहसिलदार यांनी मेघा इंजिनिअरींग कंपनीने मंजुरीपेक्षा अधिक उत्खनन केल्याप्रकरणी कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र संबधित कंपनीने प्रतिसाद न दिल्यामुळे व त्यांच्यामध्ये अर्थपुर्ण सेटलमेंट झाल्यामुळे महसूल प्रशासनाने उत्खनन मस्सा (खं), हसेगाव (के) व येरमाळा येथील शेतकर्‍यांच्या सर्वे नंबरवर कसलीही खातरजमा न करता 40 कोटीच्यावर बोजाची नोंद केली आहे. 


सदर नोंदवलेला बोजा बेकायदेशीर असून संबधित शेताची स्थळ पाहणी करुन या तीनही गावातील शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावरील बेकायदेशीर बोजा रद्द करुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, यासाठी 26 जानेवारी रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांना निवेदनही दिले होते. मात्र आजतागायत कसलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.7) सकाळी 9 वाजता कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथील शेगांव-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे.
 
Top