काटी , दि . २८ :

तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे मंगळवार दि.28 रोजी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष खंडु बब्रुवान कुंभार यांच्या वतीने  मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा घेऊन  मराठी भाषा दिन उत्साहात  साजरा करण्यात आला.


 आजच्या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास,मराठी भाषेचा इतिहास, मराठी साहित्य समजावे व वकृत्व स्पर्धेच्या  माध्यमातून मराठी भाषेला दिशा देण्यासाठी व मराठी भाषेचे संवर्धन होण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी "मराठी भाषेचे महत्त्व" हा विषय देऊन वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
       

या स्पर्धेत लहान गट व मोठा गट विभाग करण्यात आले होते. लहान गटातून प्राजक्ता दुरुगकर, आर्यन काळे, जिया पठाण, कल्याणी कुंभार यांनी सहभाग नोंदवून तर मोठ्या गटातून रामेश्वरी तांबे, प्रज्ञा कापसे, साक्षी तांबे यांनी सहभाग घेऊन रोख स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षीस पटकावले.
         

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप तांबे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश इंगळे सुहास वडणे, आयाज पटेल, अमिरुद्दीन पटेल, डॉ.गोविंद तांबे, खंडू रोकडे, राहुल क्षिरसागर, महावीर जगताप, दाऊद मुलानी, तात्यासाहेब पारधे आदी मान्यवरांसह शाळेचे मुख्याध्यापक दुरुगकर, सहशिक्षक विजयकुमार गायकवाड,  श्रीमती वासंती गायकवाड उपस्थित होते.
 
Top