हैद्राबाद मुक्ती संग्रामातील उपेक्षित स्वातंत्र्य सैनिक मच्छिंद्र बनसोडे
दि.१५आँगस्ट १९४७ रोजी
आपला भारतदेश स्वतंत्र झाला. परंतु आपल्या देशातील काही संस्थानिक स्वतंत्र्यामध्ये विलीन होण्यास तयार नव्हते.त्यात हैदराबादचे निजाम संस्थान होते.
त्यावेळी मराठवाड्यातील सात ही जिल्हे निजाम राजवटीखाली होते. निजाम संस्थान मधून मराठवाड्यातील सातही जिल्हे बाहेर काढून देश स्वातंत्र्यात विलीन करण्याकरीता झालेल्या हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात अनेकांनी प्राणाची आहुती दिली तर अनेकांनी या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन जीव मुठीत धरून रझाकाराविरूध्द लढा दिला.कारावास भोगला.शेवटी १७ सप्टेंबर१९४८रोजी निजाम संस्थान बरखास्त झाले.व स्वतंत्र भारतात विलीन झाले.म्हणजे मराठावाड्याला सन १९४८ ला खरे स्वातंत्र मिळाले असे म्हणावे लागेल.
या हैदराबाद मुक्ती संग्रामात उस्मानाबाद जिल्ह्यातील भिमनर नळदुर्ग ता.तुळजापूर येथील लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी मच्छिंद्र मारूती बनसोडे हे सक्रिय होते. त्यांचा जन्म दि.१२/०८/१९२४ रोजी नळदुर्ग ता.तुळजापूर येथे मागासवर्गीय बौद्ध कुटुंबात झाला.वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला. त्यांनी नायकाच्या आदेशानुसार भुमिगत राहुन अनेक ठिकाणी या मोहीमेत राझाकारां विरुद्ध नायकाने दिलेल्या सुचनेनुसार शिंदीच्या झाडे नुकसान करून व त्यांची करोडगिरी नाके उध्वस्त करत करत रझाकारांचे सर्व महसुली मार्ग बंद करत असत. आताच्या उमरगा तालुक्यातील गुंजोटी,नाईचाकुर तसेच तुळजापूर तालुक्यातील नंदगाव, सिंदगाव, केशेगाव, बोरामणी , नळदुर्ग इत्यादी ठिकाणी आपल्या असंख्य सहकारी यांच्या सोबत उपाशीपोटी राहुन रझाकारास जेरिस आणले.
दरम्यानच्या काळात नळदुर्ग शहरातून जाणाऱ्या मुंबई ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गवर नळदुर्ग नजीक असलेला आलीयाबाद पुल उध्वस्त करण्याचा रजाकारांचा कट उधळून लावण्यात मच्छिंद्र बनसोडे हे सहभागी होते
या लढ्यात अनेक महिला व पुरुषानी वेगवेगळ्या ठिकाणी कारावास भोगला त्यामध्ये मच्छिंद्र मारूती बनसोडे यांनी देखील कर्नाटकातील गुलबर्गा या ठिकाणी रझाकारांनी दिलेला कारावास व दंड भोगला.
मराठवाड्यातील सातही जिल्हे देशस्वतंत्र्यात विलिन करण्यात मच्छिंद्र मारूती बनसोडे यांचे कार्य नळदुर्ग शहर, व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व जनतेला सतत प्रेरणा देत राहील यात शंका नाही.
परंतु शासनाने तयार केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत त्यांचे नाव वंचित होते.त्यामुळे स्वतंत्र्य सैनिकाना मिळणाऱ्या सर्व शासकीय सुविधा पासून ते जिवनाच्या अखेर पर्यंत उपेक्षितच राहिले. स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत आपले नाव समाविष्ट करून स्वातंत्र्य सैनिकाना मिळणाऱ्या सर्व शासकीय सेवा मिळाव्यात या करिता शासनाकडे पाठ पुरावा करत असतानाच त्यांचा दि.०८/०७/२०१२ रोजी म्रत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी दुषयंता मच्छिंद्र बनसोडे यांना मरणोत्तर स्वातंत्र्य सेनानीचा मान शासनाने दिला आहे.
हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील उपेक्षित स्वातंत्र्य सेनानी मच्छिंद्र मारूती बनसोडे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी सतत प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ किमान नळदुर्ग शहरात त्यांंचे स्मारक व्हावे हीच अपेक्षा.
दि.०३/०२/२०२२ रोजी स्वातंत्र्य सेनानी दुष्यंता मच्छिंद्र बनसोडे यांचा प्रथम स्मृतीदिन आहे. त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्याना भावपूर्ण श्रद्धांजली
एस.के.गायकवाड
मु..पो.वागदरी, ता.तुळजापूर