नळदुर्ग , दि . ६
नळदुर्ग येथील अलियाबाद स्मशानभुमीचे रखडत पडलेले बांधकाम नगरपालिकेने तात्काळ पुर्ण करून घ्यावे अन्यथा पंधरा दिवसानंतर नगरपालिकेवर तिरडी मोर्चा काढणार असल्याचा इशारा शहर भाजपचे माजी अध्यक्ष पद्माकर घोडके यांनी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या निवेदनात घोडके यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासुन अलियाबाद येथील हिंदु स्मशानभुमी नव्याने बांधकाम करण्यासाठी पुर्णपणे पाडण्यात आली आहे. ठेकेदाराने या स्मशानभुमीचे बांधकाम गेल्या तीन महिन्यांपासुन बंद ठेवले आहे. या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही. याचा परिणाम म्हणुन या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. स्मशानभुमीचे बांधकाम का रखडत पडले आहे समजत नाही. नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला स्मशानभुमीचे बांधकाम करण्याचा आदेश दिल्यानंतर ठेकेदाराने जुनी स्मशानभुमी पाडुन टाकली आहे. मात्र शहराची गरज लक्षात घेऊन त्याठिकाणी तात्काळ नवीन स्मशानभुमी बांधण्याचे काम पुर्ण करणे गरजेचे होते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासुन नवीन स्मशानभुमी बांधण्याचे काम सुरू केले नाही. फक्त याठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. येत्या आठ दिवसात ठेकेदाराने या स्मशानभुमीचे काम सुरू करावे यासाठी न.प.प्रशासनाने आपल्या पातळीवर प्रयत्न करून हे काम सुरू करावे. आठ दिवसात हे काम सुरू झाले नाही तर येणाऱ्या १५ दिवसांत पुन्हा कोणतीही पुर्व सुचना न देता नगरपालिकेवर तिरडी मोर्चा काढुन न.प.प्रशासनाचा निषेध करून त्याचठिकाणी तिरडीचे दहन करण्यात येणार असल्याचे पद्माकर घोडके यांनी या निवेदनात म्हटले आहे.