वागदरी , दि . २६ : एस.के.गायकवाड
देशातील मोठ मोठ्या कंपन्या,लघु उद्योग, मोठे उद्योग तांत्रिक आडचणीमुळे बंद पडू शकतात. पण शेती हा असा एकमेव उद्योग आहे की, तो कधीही बंद पडू शकत नाही.तेंव्हा शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन नियोजनबध्द शेती करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील (परभणी) यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना केले.
शिव-बसव-रणा-काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी च्या वतीने शिवजयंती निमित्ताने वागदरी येथे आयोजित शिवसप्ताहामध्ये परभणी येथील प्रसिद्ध हवामान आभ्यासक पंजाबराव डक पाटील यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार हे होते. प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह महाराज, महात्मा बसवेश्वर, व थोर संत काशीबा महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करून हवामानतज्ञ पंजाबराव डक पाटील यांच्या हस्ते गावातील जेष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी मिटकर गुरूजी, अशोक धुमाळ गुरुजी,राजेंद्र पाटील, सुरेशसिंग परिहार, कृष्णा वाघमारे, संदिपान वाघमारे, राम बिराजदार, गोविंद गुरव आदी शासनाच्या विविध विभागातून शासकीय सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जेष्ठ कर्मचाऱ्यांचा जन्मोत्सव मंडळाच्या वतीने फेटा पुष्पहार, व शिवप्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पंजाबराव डक पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुढे बोलताना ते म्हणाले की,शेतकऱ्यानी परिस्थिती नुसार बदत्या हवामानाचा अंदाज बांधला पाहिजे. जसे की चिमणी पाखरे धुराळ्यात अंघोळ करत असतील, कांवळे आपले घरटे झाडाच्या मध्यभागी बांधत असतील, सरपटणारे प्राणी सतत जमीनवर येत असतील तर समजावे की,यावर्षी वेळेत व चांगला पाऊस पडणार आहे. असा अंदाज बाधून शेतीची पेरणी पूर्व मशागत करून शेत जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी. तसेच बियाणे स्वतःच तयार करून ठेवावे, बाजारातून सोयाबीन खरेदी करताना फुले संगम किंवा फुले किमया या जातीचे बियाणे वापरावे, रब्बी हंगामातील गहू, हरबरा ही पिके थंडीत येणारी आहेत . तेंव्हा वाटीत काढून ठेवलेले खोबरेल तेल ज्या दिवशी अळूण घट्ट होईल त्या दिवशापासुन गहू, हरभरा पिकांची पेरणी करावी. वेळच्या वेळी तननाशकाची फवारणी करावी .पश्चिम महाराष्ट्रात झाडे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तिथे पिकाना पुरक असा रिमझिम पाऊस पडतो .तर या उलट मराठवाड्यात झाडांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथील तापमानात वाढ होऊन वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस पडून पिकांचे नुकसान होते. त्यामुळे झाडे लावणे व ती जगविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन अँड.अमोल पाटील यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे सुरेंद्रसिंग ठाकूर, प्रमोद बिराजदार, भरतसिंग ठाकूर, महेश बिराजदार, योगेश सुरवसे, श्रीकार धुमाळ, लक्ष्मण बिराजदार, अमोल गोगावे, बाबूराव बिराजदार, दीपक धुमाळ, सौरव यादव, पंकज सुरवसे सह परिरातील शेतकरी, युवा कार्यकर्ते, ग्रामस्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.