काटी , दि .०१


तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील अगाध महिमा असलेल्या श्री विष्णू-महादेव मंदिरात   महाशिवरात्रीनिमित्त तामलवाडीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दिवसभर उपस्थिती लावून श्रींचे दर्शन घेतले.



महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच अभिषेकांना आरंभ करण्यात आला. यानंतर महापूजाही करण्यात आली. सीताराम भाकरे, दादा पवार व इतर काही भाविकांनी श्रींच्या सुशोभीकरणासाठी, सजावटीसाठी द्राक्ष मोठ्या प्रमाणात समर्पित केली. यामुळे श्रींच्या मंदिराची हार-फुलांसह द्राक्ष फळांनीही सजावट करण्यात आली. सकाळी 6 वाजताच्या महापूजेनंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत होती. 


आज दिवसभर हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. भाविकांच्या नवसाला पावणारा शंभू-महादेव म्हणून या देवाची मोठी ख्याती असल्याने तामलवाडी पंचक्रोशीसह सोलापूर शहरातील शेकडो भाविक या देवाच्या दर्शनासाठी दर सोमवारी येतात. महाशिवरात्री आणि येथील यात्रा सोहळ्यासह हे भाविक आपली हजेरी लावतात. याचबरोबर येथील पांढरीवरील श्री महादेव मंदिरातही शेकडो भाविकांनी हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले. आता कोरोनाचे सावट काही प्रमाणात कमी झाल्याने श्रींच्या दर्शनासाठी अबालवृध्दांसह महिलांची मोठी गर्दी दिसून आली. सायंकाळी भजन-किर्तनाच्या कार्यक्रमाने महाशिवरात्री महोत्सवाची सांगता करण्यात आली.


काशी विश्‍वेश्‍वरांप्रमाणेच हे देवस्थान !
तामलवाडी येथील या विष्णू-महादेवाच्या मंदिराचे बांधकाम अत्यंत पुरातन आहे. हरी आणि हर म्हणजेच विष्णू आणि महादेव मूर्ती एकाच गाभार्‍यात आणि अगदी समोरासमोर (पूर्वमुखी) येथे आहेत. काशी विश्‍वेश्‍वरानंतर याच मंदिरात विष्णू-महादेव मूर्ती एकत्र असल्याची माहिती मंदिर पुजारी नागनाथ गुरव, केशव गुरव यांनी दिली.
 
Top