नळदुर्ग , दि . २ : आजित चव्हाण


  नळदुर्ग  शहरात कॅनॉलमध्ये इसमाचा मृतदेह आढळुन आल्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी २४ तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस सोमवार दि . २८ फेब्रुवारी रोजी अटक करुन न्यालयासमोर हजर केले असता चार दिवस म्हणजे दि. ४  मार्च रोजी पर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यानी सांगितले. 


दि.२५ फेब्रुवारी रोजी मयत आढळुन आलेल्या संजय हनुमंत कोळी याचा मारेकरी त्याचा पुतण्या असल्याचे पोलिस तपासात पुढे आले असुन पोलिसांनी त्या पुतण्याला  अटक केली आहे.  नळदुर्ग पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.


  दि.२५ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सुधीर सुर्यकांत पाटील यांच्या शेतालगत पाण्याच्या कॅनॉलमध्ये संजय हनुमंत कोळी वय ५५ रा . इंदिरानगर नळदुर्ग हा मयत अवस्थेत मिळुन आला. त्यावरून मयताचा पुतण्या खंडू लक्ष्मण कोळी याने खबर दिल्यावरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु क्र .११ / २०२२ कलम १७४ सीआरपी प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
   

त्यानंतर मयतावर जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पीएम करण्यात आले. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्ग येथील दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत हा पाण्यात बुडुन मयत झाला नसल्याचे तर त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे मयत झाल्याचा अभिप्राय दिला. अभिप्राय आल्यानंतर सदरील प्रकार हा अकस्मात नसुन घातपात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस प्रशासनाने मयताचा भाऊ लक्ष्मण हनुमंत कोळी याला बोलाऊन त्याची फिर्याद घेतली. 

या फिर्यादीमध्ये त्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी माझा भाऊ संजय हनुमंत कोळी याच्या डोक्यात कशाने तरी मारून खुण करून त्याचे प्रेत बोरी धरणाच्या कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात टाकले. 
  

 यावरुन पोलिस ठाणे नळदुर्ग येथे गुरनं. ६५ / २०२२ कलम ३०२, २०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास सुरू केला. त्यावेळी अकस्मात मृत्युची खबर देणारा मयताचा पुतण्या खंडू लक्ष्मण कोळी रा. इंदिरानगर यानेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले . त्यास सदरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सध्या तो पोलिस कोठडीत आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्याचे काम नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सहाय्यक  पोलिस निरीक्षक  सुधीर मोटे, अनिल जोशी, धनाजी वाघमारे, विशाल सगर यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे.
 
Top