लोणी, दि.५
युक्रेन मध्ये अडकलेल्या नगर जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपले प्रयत्न सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी सुरु केलेले मिशन गंगा अभियान हे दिलासा देणारे ठरले असल्याची प्रतिक्रीया खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.थ
युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या शिर्डी मतदार संघातील विद्यार्थी आदित्य संतोष नळे आणि निखील सुभाषराव गुळवे यांचे भारतामध्ये सुखरुप आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मिशन गंगा अंतर्गत सुखकर झालेल्या या प्रवासाबद्दल खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
अस्तगाव येथील आदित्य संतोष नळे आणि निखील सुभाषराव गुळवे हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले होते. परंतू युध्दजन्य परिस्थितीमुळे त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले आहे. या परिस्थितीत मायदेशी यायचे कसे असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर होता. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन गंगा अंतर्गत युक्रेन मध्ये असलेल्या भारतीय नागरीकांना सुखरुप आणण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली. या मोहीमेतच हे दोन्हीही विद्यार्थी सुखरुप परत आल्याबद्दल त्यांच्या पालकांनी आणि परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांचे स्वागत केले आणि या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक भारतीयाला मायदेशी सुखरुप आणण्यासाठी मोदीजींनी केलेले प्रयत्न हे महत्वपूर्ण आहेत. चार केंद्रीय मंत्र्याचे पथक यासाठी तयार करण्यात आले असून, प्रत्येक भारतीय सुखरुप यावा यासाठीच केंद्र सरकारचा पाठपुरावा सुरु आहे. नगर जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी सुखरुप येईल यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपला पाठपुरावा सुरु असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.