मुरूम, ता. उमरगा, दि . ११ :
कसगी, ता. उमरगा येथील श्री सिध्देश्वर देवस्थान ही यात्रा दरवर्षी मोठया उत्साहात भरली जाते परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे सदर यात्रा भरू शकलेली नाही. यंदा ही यात्रा मंगळवारी रोजी भरविण्यात आली.
ही यात्रा कर्नाटक सीमेलगत असलेल्या कसगी गावात खास करून बैल जोडी खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होते. या यात्रेमध्ये परिसरातील विविध भागातून शेतकरी, व्यापारी बैल खरेदी-विक्रीसाठी मोठया प्रमाणात गर्दी करतात. या यात्रेतून येणेगूर येथील व्यापारी गणीसाब इब्राहिम मुल्ला यांनी चांगली खिल्लार जोडी विक्रीसाठी आणली होती. सदर बैलजोडी आकर्षक, दोन दाती खोंड असल्याने यास अनेकांनी मागणी केली. सदर जोडीही या यात्रेचे लक्ष वेधून घेणारी ठरली. पहावं आणि पाहताच राहावं अशी खिल्लार जोडीही अडीच लाख रुपये किंमतीने विकली गेली. ही खिल्लार जोडी येणेगूर येथील शेतकरी श्रीहास गौरीशंकर उटगे यांनी खरेदी करुन आपल्या गावी वाजत-गाजत आणली. यावेळी महेबूब मुल्ला, अल्लाउद्दीन मुल्ला, बाबासाहेब बिराजदार, सुरेश मगरे, सोमशंकर पाटील, मैनोदीन मुल्ला, पिंटू जमादार, संतोष पांचाळ, विठ्ठल पांचाळ, आसिफ मुल्ला, संतोष बिराजदार, गुंडू मुल्ला आदींनी या खरेदी-विक्री व्यवहारात मदत व सहकार्य करून बैल जोडी मालकाचे कौतुक केले.