नळदुर्ग , दि . १३ : विलास येडगे :

 २ कोटी ४३ लाख रुपयाच्या नळदुर्ग घरकुल घोटाळ्यातील न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी नळदुर्ग नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिलीप गणपतराव  देशमुख यांना जिल्हा सत्र न्यायालयाने १ लाख रुपयाच्या जात मुचलक्यासह कांही शर्थी व अटीवर जमिन मंजुर केला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासुन देशमुख न्यायालयीन कोठडीत होते.
    

 नळदुर्ग नगरपालिकेने सन २००८ साली राज्य शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी निर्मुलन योजनेअंतर्गत राबविलेल्या घरकुल योजनेत झालेल्या २ कोटी ४३ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी नळदुर्गचे तत्कालिन नगराध्यक्ष व तत्कालिन मुख्याधिकारी यांच्यासह इतर आठ जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात ३२२/२०१९ कलम ४०६,४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 यानंतर हे सर्व आरोपी जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते मात्र त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. तेंव्हापासुन हे सर्व आरोपी फरार झाले होते. यातील आरोपी तत्कालीन नगराध्यक्ष उदय जगदाळे यांना मेडिकलवर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी व या गैरव्यवहारातील आरोपी दिलीप देशमुख हे पोलिसांना शरण आले होते.त्यानंतर त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १० नोव्हेंबर २०२१ रोजी न्यायालयाने  न्यायालयीन कोठडीत पाठविले होते तेंव्हापासुन दिलीप देशमुख हे न्यायालयीन कोठडीत होते. दि.१० मार्च २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलीप देशमुख यांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. तब्बल तीन ते चार महिन्यानंतर देशमुख हे जेलच्या बाहेर आले आहेत.या प्रकरणात दिलीप देशमुख यांचे वकील ऍड. मिलिंद पाटील हे आहेत.
     


 दिलीप देशमुख यांना जामीन मंजुर झाला असल्याने आता या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींना हे आरोपी अटक झाल्यानंतर यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
Top