जीवनात पुस्तकांची जागा दुसरी कोणीही घेऊ शकत नाही, पुस्तक हेच माणसाचे खरे सोबती आहेत, जेव्हा कोणीही सोबत नसतो तेव्हा देखील पुस्तके साथ देतात आणि कोणताही भेदभाव न करता सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. 

प्रत्येक माणसाच्या यशात पुस्तकांचे अमूल्य योगदान असते, संपूर्ण आयुष्य पुस्तके साथ देवून जीवनात चांगले जगण्याची प्रेरणा देतात. दरवर्षी 23 एप्रिल रोजी "जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन", संयुक्त राष्ट्र (युनेस्को) द्वारे वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित वार्षिक कार्यक्रम आहे, याची सुरवात 1995 पासून झाली आणि जगभरात मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी 2022 ची थीम "वाचा... जेणेकरून तुम्हाला कधीही एकटेपणा जाणवणार नाही" आहे.

जगभरातील ज्ञान देवून वाचन, लेखन आणि बोलण्याची कौशल्ये सुधारण्यात तसेच विचार, वर्तन, नीतिमत्ता, स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढवण्यात पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावतात. 2005 च्या बीओपी वर्ल्ड कल्चर स्कोर इंडेक्सनुसार, भारतीय लोक आठवड्यातून 10 तासांपेक्षा जास्त वेळ वाचण्यासाठी घालवतात. ससेक्स विद्यापीठातील 2009 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की वाचन मुळे 68% टक्क्यांनी तणाव कमी होवू शकतो, फक्त सहा मिनिटांच्या वाचनाने हृदय गती कमी होते आणि स्नायूंचा ताण कमी होतो. वाचन लक्ष्य केंद्रित करण्यास सुधारणा करते, सोबतच शब्दसंग्रह विस्तृत करून स्मरणशक्ती वाढवते. जगातील प्रसिद्ध उद्योजक, नेते, सेलिब्रिटी कितीही व्यस्त असले तरी ते दररोज पुस्तक वाचण्यात थोडा वेळ घालवतात, अनेक लोक घरी पुस्तकांचा संग्रह करून खासगी ग्रंथालये निर्माण करतात. थिओडोर रुझवेल्ट, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे 26 वे राष्ट्रध्यक्ष म्हणून काम करत असताना, त्यांच्या व्यस्त वेळेतून सुद्धा दररोज 2-3 पुस्तके किंवा किमान एक पुस्तक तरी वाचत असत. बुक ट्रस्ट 2013 च्या सर्वेक्षणानुसार, जे लोक दररोज पुस्तक वाचतात ते इतरांपेक्षा जीवनात अधिक समाधानी, आनंदी असतात. 

अमेरिकन समाजशास्त्रज्ञांचा असा युक्तिवाद आहे की ज्या मुलांनी वयाच्या आठव्या वर्षापर्यंत चांगले वाचायला शिकले आहे ते भविष्यात चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता कमी आहे.

कुटुंबात मुलांसोबत वाचन केल्याने पुस्तकांचा आनंदी सहवास निर्माण होतो, वाचनाची आवड असल्यास आपण कंटाळा न करता सातत्याने अनेक तास वाचन करू शकतो, वाचनाने सकारात्मक ऊर्जा मिळते. जगातील कोणत्याही पदावर जाण्याचा किंवा कोणत्याही क्षेत्रात विजयी होण्याचा मार्ग पुस्तकेच मोकळा करतात. मानवी जीवनात पुस्तकांचे स्थान हे गुरु, मार्गदर्शक, मित्र, सल्लागार, हितचिंतकाचे असते, ज्यामुळे माणूस संस्कार, सदाचार, ज्ञान, जागरूक, कर्तव्यदक्ष, प्रामाणिकपणा, परोपकार, समजूतदार, विवेकी अशा अनेक सद्गुणांमध्ये पारंगत होण्यास सक्षम होतो.

आजच्या आधुनिक युगात इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील पुस्तकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे, यांत्रिक संसाधनातून (मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप इ.) आपण हवे तेव्हा ई-बुक, ऑडिओ बुक वाचू ऐकू शकतो. पण पुस्तक हातात धरून वाचण्यात जो समाधानकारक आनंद मिळतो तो स्क्रीनवर वाचताना मिळत नाही, काही काळानंतर, स्क्रीनवर वाचन कंटाळवाणे होते आणि मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ताण निर्माण होऊ लागतो. टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन काम आणि ऑनलाइन लर्निंगने त्याचे कंटाळवाणे वास्तव दाखवून दिले आहे, ऑनलाइन ई-बुक किंवा ऑडिओ बुक हे थोड्या काळासाठी वरदान आहे पण दीर्घकाळासाठी शाप ठरू शकते.


अज्ञानी माणसाला या जगात सर्वात जास्त त्रास होतो कारण तो पुस्तकांच्या ज्ञानापासून दूर राहतो. पुस्तकांमध्ये दडलेली ज्ञानाची संपत्ती कोणीही लुटू शकत नाही, तुम्ही जेवढे वाचाल, तेवढ्याच गोष्टी तुम्हाला कळतील, वाचक बनून व शिकून तर खूप फायदा होतो. पुस्तके वाचल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोघांना फायदे होतात आणि हे फायदे आयुष्यभर टिकतात. पुस्तक एखाद्या साधना प्रमाणे कल्पनाशक्तीला प्रज्वलित करते. संशोधनद्वारे सिद्ध झाले आहे की पुस्तके वाचण्याची सवय तणाव कमी करून नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करते, तसेच समाधानकारक दीर्घायु उंचविण्यात मदत करते, वाचनाची सवय चांगली झोप येण्यास मदत करून मन शांत आणि मेंदूला तल्लख होण्यास उपयुक्त ठरते.


चला तर मग आपणही एक प्रतिज्ञा घेऊया, आयुष्य अधिक चांगले आणि समाधानकारक बनवण्यासाठी, वेळेचा सदुपयोग करून पुस्तके वाचण्याची चांगल्या सवयींना आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनवूया. चांगल्या सवयी कधीही चुकवू नये, ह्याच चांगल्या सवयी जीवन तणावमुक्त करून आनंदी वातावरण निर्माण करण्याचा मुख्य आधार आहे आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे.

डॉ. प्रितम भी. गेडाम
prit00786@gmail.com
 
Top