नळदुर्ग , दि . ११ : विलास येडगे
येथील श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थान येथे दि.१० एप्रिल रोजी श्री राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी १०८ रामभक्तांनी पवित्र रामकुंडातील कलशात जल आणुन प्रभु श्री रामचंद्राना जलाभिषेक केला. तुळजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे येऊन श्री प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेतले.
येथील श्री क्षेत्र रामतीर्थ हे प्राचीन व श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र आहे. याठिकाणी दरवर्षी रामजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो मात्र यावर्षी महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामजन्मोत्सव सोहळा भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री क्षेत्र रामतीर्थ येथील राममंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दि.९ एप्रिल रोजी रात्री होमहवनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर रात्रभर भजनाचा कार्यक्रम झाला. दि.१० एप्रिल रोजी सकाळी ९ वा. श्री क्षेत्र रामतीर्थाच्या इतिहासात पहिल्यांदाच श्री प्रभु रामचंद्रांना याठिकाणी असणाऱ्या पवित्र रामकुंडातील जल आणुन जलाभिषेक करण्यात आला. यावेळी १०८ रामभक्तांनी सोवळे वस्त्र परिधान करून रामकुंडातील पाणी वाजत गाजत आणुन श्री प्रभु रामचंद्रांना जलाभिषेक केला. यानंतर श्री राम शृंगार करण्यात आला. यानंतर दुपारी बारा वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी श्री प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत माजी जि. प.सदस्य गणेश सोनटक्के, ॲड. दीपक आलुरे,भाजपाच्या जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर,भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव आदीजन उपस्थित होते.
रामजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व रामभक्तांच्या सहकार्याने पार पडले. यावर्षीच्या राम जन्मोत्सव सोहळ्यास श्री क्षेत्र रामतीर्थ येथे हजारो भाविक श्री प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. नळदुर्ग अणदुर, रामतीर्थ, अलियाबाद, लोहगाव, येडोळा, नंदगाव या गावांतील रामभक्त मोठ्या संख्येने श्री क्षेत्र रामतीर्थ येथे दाखल झाले होते.
रामजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नळदुर्ग व अणदुर येथील तरुण रामभक्तांनी पालखी मिरवणुक काढली होती. या दोन्ही पालख्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे दुपारी बारा वाजता दाखल झाल्या होत्या.