काटी , दि . १४ : उमाजी गायकवाड 


तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि.12 रोजी स्व. लक्ष्मण तुकाराम चिवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या गतस्मृतीना उजाळा देण्यासाठी उद्योजक नेताजी चिवरे यांच्या परिवाराच्या वतीने  समाज प्रबोधनकार  हभप पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणेकर यांचा किर्तन सोहळा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या भव्य मैदानावर पार पडला. 



प्रारंभी पुरुषोत्तम पाटील महाराज, उद्योजक नेताजी चिवरे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, चेअरमन विक्रमसिंह देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते स्व. लक्ष्मण चिवरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा चिवरे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
      

राज्यभरात आवाजाचे जादुगार, गायन सम्राट म्हणून आणि सांप्रदायिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेले हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी आपल्या मधूर वाणीने पंचक्रोशीतील भाविकांना मंत्रमुग्ध केले. टाळ, मृदृंगाच्या गजरात आवाजाचे जादुगार समजले जाणारे पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा किर्तन सोहळा प्रत्यक्षात  अनुभवण्यासाठी काटीसह पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
    

" ऐसी जोडी करा राम कंठी धरा! नाशीवंत आटी प्रियापुत्रधन! बीज ज्याचा सीण ते चि फळ!!धु.!!
नाव धड करा सहस्त्र नामांची!
जे भवसिंधुची धडी पावे!!2!!
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी!
भाता भरा हरीरामबाणीं!!3!! या संत तुकारामांच्या अभंगावर निरुपम करत आणि आई माझी मायेचा सागर 
दिला तिने जीवना आकार 
आई वडिल माझे थोर 
काय सांगू त्यांचे उपकार 
जीवनाच्या वाटेवरती 
किती अस्तो त्यांचा उपकार 
आई माझी मायेचा सागर .. या ओवीवर गायन करीत कार्यक्रमात रंगत आणत आई-वडिलांच्या सेवेत खरा परमार्थ दडला आहे. आई वडिलांची सेवा करा मग तुम्हाला तिर्थक्षेत्राची वारी करण्याची गरज नाही. तरुणांनी व्यसन करुन आयुष्याची बरबादी करून घेऊ नये.  प्रत्येक जणच जगतो. मात्र जो समाजासाठी, लोकांसाठी आणि देशासाठी जगतो. त्यांचेच नाव, ओळख पाठीमागे राहते. असे प्रतिपादन प्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी केले.
      

आपल्या किर्तनपर प्रबोधनात हभप पुरुषोत्तम पाटील महाराज पुढे बोलताना म्हणाले की, चिवरे परिवाराच्या वतीने उद्योजक नेताजी चिवरे यांनी भजन, किर्तनाची आवड असणारे त्यांचे वडिल कै. लक्ष्मण चिवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्रध्देने केलेले किर्तन सोहळ्याचे सुंदर नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करीत कै. लक्ष्मण चिवरे यांना एवढे धार्मिक वातावरण पाहून निश्चितच समाधान वाटणार असल्याचे सांगितले. जीवनात तर सगळ्यांनाच एक दिवस जावे लागणार आहे. जाणे हा निसर्गाचा नियम असल्याचे सांगून तो जगला कसे याला महत्त्व असल्याचे सांगितले. 


संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज हे जीवन थोडे दिवस जगले परंतु ते  कार्य सुंदर करून गेले. त्यामुळे त्यांचे नाव आजही घेतले जाते. माणसाने जीवन कसे जगावे हा ज्याचा त्याचा विषय आहे माणसाचं जीवन क्षणभंगुर आहे. परंतु क्षणभराचे का होईना माणसाने जीवन असे जगावे की मनुष्य मेल्यावरही त्याचा सुगंध दरवळला पाहिजे. त्यामुळे जगण्याची आशा सोडलेल्या व कित्येक जीवांना जगवणाऱ्या, घडवणाऱ्या जेष्ठ समाजसेविका पद्मश्री कै. सिंधुताई सपकाळ यांनी मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं असे म्हणाल्याचे सांगितले. प्रभू नामात मोठी शक्ती असून, परमार्थ केल्यानेच माणसाच्या जीवनातील अवघड रस्ता सोपा होतो. त्यासाठी प्रत्येकाने जीवनात परमार्थ करावा, असे निरुपण हभप पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणेकर यांनी केले. 

तसेच या  कार्यक्रमात काटीतील भजन गायक ब्रम्हदेव माळी यांनी अप्रतिम गायन केल्याबद्दल व तबला वादक कृष्णा मनोहर कदम यांचा हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचेकडून विशेष सन्मान करण्यात आला . यावेळी टाळ, मृदृंगाच्या, हरिनामाच्या गजराने काटी नगरी दुमदुमून गेली होती. याप्रसंगी उद्योजक नेताजी चिवरे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सोसायटीचे चेअरमन विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी,अनिल गुंड, जितेंद्र गुंड, तानाजी चिवरे,माजी सैनिक श्रीकांत गाटे, चिवरे परिवारातील सदस्य, गाटे गल्ली भजनी मंडळ, माळी गल्ली भजनी मंडळ यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top