मुरूम, ता. उमरगा, दि. २३ :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्नित श्री माधवराव पाटील महाविद्यालय व बाबुराव आडसकर महाविद्यालय, केज यांच्यात शुक्रवारी (ता.२२) रोजी सामंजस्य करार करण्यात आला.
महाविद्यालयात रसायनशास्त्र व पदार्थविज्ञान या दोन विषयाचे संशोधन केंद्र असून या केंद्रातून सध्या अनेक विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. या संशोधन केंद्राची अद्यावत प्रयोगशाळा असून सर्व प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत. या सेवा-सुविधांचा उपयोग संशोधन कार्य करणाऱ्या संशोधकांसाठी व्हावा या हेतूने. बाबुराव आडसकर महाविद्यालयातील संशोधकांना उपलब्ध करून देण्याकरिता दोन्ही महाविद्यालयात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी आडसकर महाविद्यालयाचे पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. संभाजी भंडे यांनी उपस्थित सर्व संशोधक विद्यार्थ्यांना नॅनो टेक्नॉलॉजीचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. महादेव सुवर्णकार यांनीही नाविन्यपूर्ण संशोधन कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडो अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे हे होते. या वेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार रोहिकर, डॉ. सुजित मठकरी, प्रा. भूषण पातळे, प्रा. सचिन राजमाने, डॉ. सुभाष हुलपल्ले आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुशील मठपती तर आभार डॉ. रविंद्र आळंगे यांनी मानले.