तालुक्यातील दारफळ येथे अंगणवाडी क्रमांक 716 व 717 अश्या दोन अंगणवाड्या असुन अनुक्रमे 70 व 80 अशी एकूण 150 बालकांची प्रवेश संख्या आहे. या बालकांची दृकश्राव्य क्षमता विकसित व्हावी , त्यांची बैठक क्षमता वाढून त्यांच्या बौद्धिक क्षमतेत मनोरंजनाद्वारे भर पडावी यासाठी या अंगणवाड्या डिजिटल करण्यावर भर दिला असल्याचे प्रतिपादन सरपंच तथा युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॕड.संजय भोरे यांनी केले.
या दोन्ही अंगणवाड्यांमध्ये 42 इंच अँड्रॉइड 4k दूरदर्शन / दूरचित्रवाणी संच बसविण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून गूगल असिस्टंट सह अँड्रॉइड मोबाईल चे सर्व फीचर्स यात उपलब्ध असल्याची माहिती अॅड.भोरे यांनी दिली. अंगणवाडी येथे पूजा करून व नारळ वाढवून सरपंच अॅड.संजय भोरे यांच्या हस्ते हे संच सुरू करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी सतीश शिंदे, कृषी सहायक कोळी,पोलीस पाटील सचिन जाधव, बापू जाधव, अंगणवाडी सेविका मंगल सुतार, मैना भूतेकर,भोयटे, ग्रामपंचायत ऑपरेटर सुनील भुतेकर,रोजगार सेवक रोहित ओव्हाळ, ग्रामपंचायत सेवक समाधान ओव्हाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता.