नळदुर्ग , दि . ०९ : विलास येडगे
आगामी काळात साजरे होणारे सण व उत्सव शांततेत साजरे करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बोलतांना केले.
आगामी काळात साजरे होणारे श्री राम जन्मोत्सव सोहळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, भगवान महावीर जयंती व पवित्र रमजान महिन्यातील रोजे या सण, उत्सवाच्या अनुषंगाने दि.९ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. सदरील बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली.
या बैठकीस नगरसेवक शहेबाज काझी, बसवराज धरणे, मुश्ताक कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शफीभाई शेख, कमलाकर चव्हाण, शिवाजीराव मोरे, हाफिज अलीम मोहम्मद रजा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष महेबुब शेख, मन्सूर शेख, युसुफ शेख, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, अजीत जुनेदी, उमेश गायकवाड,योगेश सुरवसे, अरुण लोखंडे, संतोष मुळे, संदिप सुरवसे, आनंद पवार,ताजोद्दीन शेख, गौस मणियार, ॲड. मतीन बाडेवाले,पत्रकार विलास येडगे, भैरवनाथ कानडे, शिवाजी नाईक, आयुब शेख, नगरपालिकेचे मुनीर शेख, खलील शेख, जीविशाचे धनंजय वाघमारे, अच्युत पोतदार, वीज मंडळाचे, विनोद चौधरी, सागर कौरव आदीजन उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी म्हटले की नळदुर्ग हे शांतता प्रिय शहर आहे. नळदुर्ग शहरात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व सर्व धर्मियांचे सण व उत्सव शांततेत साजरे होतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे. हाच शहराचा उज्वल इतिहास कायम ठेऊन आगामी काळात साजरे होणारे सण व उत्सव साजरे करावेत. त्याचबरोबर या कालावधीत लावण्यात येणारे कटआऊट व झेंडे हे परवानगी घेऊनच लावावेत असेही त्यांनी यावेळी म्हटले.