नळदुर्ग ,दि . २३

नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हाद्दीतील बाभळगाव ,अणदुर , (ता.तुळजापूर )  येथे अज्ञात चोरट्यानी घरफोडी करुन रोख रक्कम , सोन्या चांदीचे दागिने तर  खानापूर ता.तुळजापूर  शिवारात  शेतातील पाणबुडी विद्युत पंपवर चोरट्यानी चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी राञी घडली.

याबाबत पोलिस सुञाकडून मिळालेली माहिती अशी की , बाभळगाव, ता. तुळजापूर येथील विजय भास्करराव पाटील हे दि. 22.04.2022 वा. सु. 04.00 वा. सु. आपल्या घरात झोपलेले होते. यावेळी अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घराची कडी उघडून घरात प्रवेश करुन विजय यांसह त्यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवून विजय यांच्या पत्नीच्या अंगावरील व घरातील कपाटातील 35 ग्रॅम सुवर्ण दागिने, ½ कि.ग्रॅ. वजनाचे चांदीचे दागिने- वस्तू व 53,000 ₹ रोख रक्कम असा माल जबरीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या विजय पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            


दुसऱ्या घटनेत अणदूर, ता. तुळजापूर येथील प्रणिता मुक्तेश्वर कबाडे यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 22.04.2022 रोजी 01.45 ते 04.00 वा. दरम्यान उचकटून घरातील 25,000₹ रक्कम व चांदीच्या वस्तू तर गावातील डॉ. प्रशांत सिद्रमप्पा झंगे यांच्या दवाखान्यातील तिजोरीतील 7,000 ₹ व दिपक कार्ले यांच्या प्रयोगशाळेतील तिजोरीतील 60,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रणिता कबाडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तिसऱ्या घटनेत खानापूर, ता. तुळजापूर येथील विनायक वसंतराव पाटील (ह.मु. सोलापूर) यांच्या खानापूर गट क्र. 96 मधील विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 21- 22.04.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या विनायक पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top