नळदुर्ग , दि .०९: विलास येडगे
नळदुर्ग येथे दि.१० एप्रिल रोजी श्री भक्तामर विधान आणि पंचकल्याणक महोत्सव साठी प्रमुख पदांची निवड समारोह कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट नळदुर्ग व पंचकल्याणक महोत्सव समितीने केले आहे.
ऐतिहासिक नळदुर्ग शहरात ८०० वर्षे प्राचिन असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असुन आता याठिकाणी भव्य असे तीन मजली मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.
दि.१० एप्रिल रोजी परमपुज्य अध्यात्मयोगी आचार्य श्री सुंदरसागरजी मुनिराज यांचे शिष्य परमपुज्य १०८ आचार्य श्री सुयशसागरजी महाराज यांच्यासह परमपुज्य १०८ मुनीश्री सुहितसागरजी महाराज, पुज्य १०५ आर्यिकाश्री शुद्धोहंश्री माताजी व पुज्य १०५ क्षुल्लक श्री सुनंम्रसागरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचकल्याणम प्रतिष्ठापणा, नंदीमंगल व तिलकदान हेतु श्री भक्तामर विधान आणि प्रमुख पद निवड समारोह कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सकाळी ७ वा. पुज्य आचार्य श्री यांचे मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन होणार आहे. यानंतर ध्वजारोहण, श्री जिनाभिषेक, भक्तामर विधान, मुख्य पदांची निवड, तिलकदान व कंकणबंधन आदी कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमानंतर आचार्य श्री यांचे मंगल प्रवचन होणार आहे. यानंतर कार्यक्रमाचे विसर्जन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जैन समाज बांधव तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व पंचकल्याणक महोत्सव समिती नळदुर्ग यांनी केले आहे.
नळदुर्ग शहरात होणाऱ्या या दिव्य, भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाची जय्यत तयारी श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व पंचकल्याणक महोत्सव समिती नळदुर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे.