तुळजापूर, दि . ०३:  डॉ. सतीश महामुनी

श्री  तुळजाभवानी मंदिरामध्ये वेगवेगळ्या सण आणि उत्सवाच्या निमित्ताने देवीला वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. त्याप्रमाणे ऋतू बदलल्यानंतर देखील देवीच्या सेवेमध्ये बदल होतो. याची प्रचिती गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाविकांना येते.

चैत्र महिना सुरू झाला की हवामान अधिक उष्ण होते आणि तीव्र उन्हाळ्याची जाणीव होते. या काळात तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर सायंकाळपर्यंत तुळजाभवानी देवीचे पलंगाचे मानकरी पलंगे परिवाराकडून गाभाऱ्यामध्ये देवीला हाताने पंखा दिला जातो. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून या परंपरेला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी तुळजाभवानी देवीच्या शिखरावर परंपरागत पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येथील पलंगाचे मानकरी जगदीश पलंगे यांनी पहिल्या दिवशी हाताने पंखा देण्याच्या सेवेला सुरुवात केली.

धुपारती झाल्यानंतर चांदीच्या दरवाजावर उभे राहून  तुळजाभवानीच्या मूर्तीला कापडी पंख्याने जगदीश पलंगे यांनी पंखा दिला. उन्हाळ्याचे दिवस असेपर्यंत हा पंखा सुरू राहतो. 


दरम्यान शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कर्नाटक आणि महाराष्ट्रातुन  मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी आल्याचे चित्र दिवसभर मंदिर परिसरात होते. मंदिर महाद्वार समोरील बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसाद खरेदी केला. 
 
Top