कळंब, दि . २९:  भिकाजी जाधव


नृत्य फक्त सांस्कृतिक अनुबंध जोपासत नाही, तर माणसाच्या जीवनाचा प्रत्येक कोपरा उत्तम कलाविष्काराने व्यापते. आपली संस्कृती, सण, समारंभ, आनंदाचे क्षण नृत्यात एकरूप झाले आहेत. म्हणून नृत्य हा माणसाच्या चांगुलपणाचा सर्वोत्तम आविष्कार आहे, असे म्हणण्यास हरकत नसावी.


मानवी जीवन उन्नत करणाऱ्या कला प्रकारात नृत्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. रंगमंचावर शास्त्रीय नृत्य करणारा कलाकार, एखाद्या इव्हेंटमध्ये पाश्चात्य नृत्याचे गतिमान दर्शन घडविणारा कलाकार, सार्वजनिक मिरवणुकीत बेभान होऊन थिरकरणारा तरूण किंवा कौटुंबिक सोहळ्यात एखाद्या गाण्यावर हळूवार ठेका धरणारे आबालवृद्ध हे सर्वच नृत्याच्या अवकाशात समानधर्मी आहे. या सर्वांना एका पातळीवर आणणारा नृत्य हा महत्त्वाचा दुवा आहे. नृत्याचे असे वेगळेपण देशोदेशीच्या अभ्यासकांनी मांडले आहे. 


मराठी विश्वकोशात ‘वर्ल्ड हिस्टरी ऑफ द डान्स’ या ग्रंथातील कूर्ट झाक्स यांच्या प्रस्तावनेतील महत्त्वाची नोंद अधोरेखित केली आहे. ‘नृत्य ही कलांची जननी होय. संगीत व काव्य या कालात्म कला होत. तर चित्रकला व वास्तुकला या अवकाशबद्ध होत. पण नृत्य एकाच वेळी काल व अवकाश या दोहोंत जगते. त्यात निर्माता व निर्मिती, कलावंत आणि कलाकृती या गोष्टी एकच असतात. हालचालींचे लयबद्ध आकृतिबंध, अवकाशाची आकारिक संवेदना, पाहिलेल्या आणि कल्पिलेल्या जगाची चित्रमय मांडणी, या साऱ्या गोष्टी माणूस नृत्याद्वारे स्वत:च्या शरीरात उत्पन्न करतो. कोणत्याही आंतरिक अनुभवास शब्द, पाषाण वा द्रव्य या माध्यमांचा वापर करुन साकार करण्याआधी ही प्रक्रिया घडत असते’. या नोंदीवरुन मानवी जीवनातील नृत्याचे महत्त्व सहज ध्यानात यावे. 


नृत्य ही सर्वात प्राचीन कला आहे. अनादी काळापासून सर्व वंशाच्या नागरिकांनी धर्माचरणात नृत्याचा वापर केला आहे. मोहेंजोदाडो येथील उत्खननात सापडलेली नर्तकीची मुर्ती त्याचे उत्तम उदाहरण आहे. नृत्याशिवाय नाटक आकारास येणे शक्य नसल्याने त्याचा प्रभावी वापर केल्याचे दाखले प्राचीन साहित्यात सापडतात. प्राचीन  वास्तू आणि साहित्यात नृत्याचे विहंगम दर्शन घडविणाऱ्या कलाकृती आहेत. कमनीय बांधा आणि नृत्यात तल्लीन झालेली नर्तकी ही तर भारतीय वास्तूकलेची ठळक ओळख आहे. भारतात नृत्याविष्काराचे बहुविध प्रकार आहेत. भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, ओडिसी, कथक, कथकली, कुडिअट्टम नृत्याची परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. या नृत्य प्रकारांनी भारताला जगाच्या पाठीवर वेगळी ओळख दिली. शास्त्रीय नृत्याचा समृद्ध वारसा लोकनृत्यानेही अधिक व्यापक केला आहे. भांगडा, लावणी, यक्षगान, गरबा, छाऊ, घुमर, सतारिया, रासलीला अशी प्रादेशिक वैशिष्ट्ये असलेल्या नृत्याने मानवी जीवन आनंदी केले आहे. 


आजची तरुणाई भारतीय आणि पाश्चात्य नृत्याकडे आकर्षित झाली आहे. फ्यूजनचे नवीन प्रयोग केले जात आहेत. ब्रेक डान्स, हिपहॉप, टेक्नो, डिस्को, बॉलिवूड अशी पाश्चात्य नृत्यशैली तरुण शिकत आहेत. त्याचा उत्तम वापर कलाविष्कारात सुरू झाला आहे. धकाधकीच्या जगण्यात नृत्याला वगळता येणार नाही. नाचणे, थिरकणे हा मानवी स्वभाव आहे. त्याला मुरड घालता येत नाही. आतून उसळून येत मनसोक्त व्यक्त होण्याचा स्वर्गीय आनंद फक्त नृत्य देऊ शकते. कळंब शहरात फ्युजन डान्स ड्रामा योगा फिटनेस स्टुडिओची सुरुवात म्हणजे ग्रामीण भागातही नृत्याचे महत्त्व अधोरेखित होणे आहे. इथे सध्या ६० विद्यार्थी नृत्याचे धडे घेत आहेत. 


नृत्याने फक्त सांस्कृतिक आनंदच दिला नाही, तर आपले आरोग्य उत्तम राखण्यास हातभारही लावला आहे. नृत्याचा परमोच्च आविष्कार आपल्याला अमर्याद आनंद बहाल करतो. ह्रदयाची स्पंदने गतिमान करणे, रक्ताभिसरण वाढवणे, वजन नियंत्रित ठेवणे, रक्तदाबापासून दूर राहण्यासाठी नृत्यासारखी व्यायाम शैली नाही. उशिराने का होईना शहरात झुम्बा वर्ग गर्दीने फुलले आहेत. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य टिकविण्यासाठी नाचण्यासारखा उपाय नाही. व्यसनमुक्ती वर्गातही नृत्य उपचार पद्धती उपयुक्त ठरली आहे. व्यसनाचा विसर पडण्यासाठी देहभान हरपून नाचणे ही उपचाराची पद्धती आहे.


 माणसाचे आयुष्य व्यापून राहिलेल्या नृत्याबद्दल संकुचित भावनेचा त्याग करुन त्याचे महत्त्व समजून घेणे नृत्य दिनाचे फलित ठरेल.
 
Top