चिवरी, दि. २६: राजगुरु साखरे:
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या दुर्ताफा गावला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले असून खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा? असा प्रश्न वाहन चालकासह प्रवाशांना पडत आहे. येथील लक्ष्मीनगर ते नळदुर्ग तुळजापूर रोडला जोडणाऱ्या चिवरी पाटी या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या उपरोक्त प्रश्न लक्षात घेऊन चिवरी ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीसाठी पत्रही दिले आहे. परंतु यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही असे सरपंच तुळजापूर लाईव्हशी बोलताना सांगितले. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाविकांसह ग्रामस्थांना मागील दोन वर्षापासून या रस्त्यावरील खड्ड्याचे धक्के खातच प्रवास करावा लागत आहे , या खड्ड्यांमुळे अनेकदा दुचाकी घसरून अपघातही झाले आहेत. आणखीन मोठ्या अपघातांला प्रशासन आमंत्रण देत आहे की काय ? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे . त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा येथील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दिला आहे, परंतु संबंधित प्रस्तावावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. प्रशासनाकडून प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे याप्रश्नी वरिष्ठांनी लक्ष घालून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा.
अशोक घोडके सरपंच चिवरी
महालक्ष्मी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे यामुळे या परिसरातील विद्यार्थी, वाहन चालकासह भाविकांची मोठी गैरसोय होत आहे यामुळे या रस्त्याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा.
बालाजी शिंदे.( कार्यकारी विकास सोसायटी चेअरमन चिवरी.)