नळदुर्ग , दि. १५ :
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि.१६ एप्रिल रोजी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे नळदुर्ग (रामतीर्थ) कुस्ती आखाडा समितीच्या वतीने महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेतील क्रमांक एकच्या कुस्ती विजेत्या पैलवानाला रोख २१ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
५० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्री क्षेत्र रामतीर्थ येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि.१६ एप्रिल रोजी श्री रामतीर्थ देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग (रामतीर्थ) कुस्ती आखाडा समितीने भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यापुर्वी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे ५० वर्षांपुर्वी त्यावेळेसचे रामतीर्थ देवस्थानचे महाराज स्व. रघुवीरप्रसाद जोशी महाराज यांच्या काळात याठिकाणी जंगी कुस्त्याचा फड रंगत होता. मात्र त्यानंतर आजपर्यंत याठिकाणी कुस्ती स्पर्धा झालेली नाही. मात्र यावर्षी देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या संकल्पनेतुन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जन्मोत्सवानिमित्त याठिकाणी भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कुस्ती स्पर्धेला पैलवानांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे संपुर्ण राज्यात कुठेच कुस्ती स्पर्धा झालेली नाही. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने कोरोना संदर्भात लावलेले सर्व निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे यावर्षी गावोगाव कुस्त्यांचे फड रंगत आहेत.
या कुस्ती स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची कुस्ती २१ हजार रुपये बक्षिसाची होणार असुन ही कुस्ती पै.दीपक कराड (लातुर केसरी) व पै. बबलु धनके यांच्यात होणार आहे. ही कुस्ती स्व. माधवराव पुदाले यांच्या स्मरणार्थ शशिकांत माधवराव पुदाले यांच्या वतीने लावण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती १५ हजार रुपये बक्षिसाची होणार आहे. ही कुस्ती पै. अमर मुसरे (उमरगा) पै. सुंदर जवळगे यांच्यात होणार आहे. ही कुस्ती स्व. मोतीराम (बाबा) चव्हाण यांच्या स्मरणार्थ जि. प.सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या वतीने लावण्यात आली आहे. क्रमांक तीनची कुस्ती १५ हजार रुपये बक्षिसाची होणार आहे. ही कुस्ती पै. आकाश भोसले (होर्टी) व पै. रामलिंग नारंगवादे (रामलिंग मुदगड) यांच्यात होणार आहे. ही कुस्ती जगदंबा तरुण मंडळ रामतीर्थ यांच्या वतीने लावण्यात आली आहे. त्याचबरोबर पै. राहुल मुळे (हाताताई कुस्ती संकुल धाराशिव व पै. सचिन पाटील (मोतीबाग तालिम कोल्हापुर) यांच्यात होणार आहे.
या प्रमुख कुस्त्यांबरोबर इतरही अनेक कुस्त्या याठिकाणी होणार आहेत. या कुस्ती स्पर्धेचे सर्वात आकर्षण म्हणजे नळदुर्गचा बाल पैलवान व ज्याने अनेक आखाडे गाजविले आहेत तो पै. स्व. विठ्ठल लाडप्पा घोडके यांचा नातु पै. समर्थ घोडके हा या स्पर्धेत पुर्ण ताकदीनिशी उतरणार आहे त्यामुळे नळदुर्गकरांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या आहेत.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पैलवानाला स्व. बजरंगसिंग ठाकुर यांच्या स्मरणार्थ बलदेवसिंग ठाकुर यांच्यावतीने मानाचा चांदीचा गदा देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणुन रणजितसिंह ठाकुर, शिवाजीराव वऱ्हाडे, मौला शेख (उपमहाराष्ट्र केसरी बादोला)खोबरे गुरुजी, दामाजी राठोड, लक्ष्मण राठोड आप्पासाहेब मुळे, नामदेव पवार, राजेश जवळगे, प्रकाश भोसले,अनिल पुदाले,बाळासाहेब शिंदे, दयानंद साळुंके व शिवप्पा जवळगे हे काम पाहणार आहेत.
ही कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महंत विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग (रामतीर्थ) कुस्ती आखाडा समिती करीत आहे.