जळकोट,दि.१२ : मेघराज किलजे


सर्व  थोर महापुरुषांच्या जयंत्या एकत्रित साजरी करणारा गणेश सोनटक्के हा  मी पहिला माणूस पहात आहे. असे गौरवोद्गार महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, महाराष्ट्र भूषण ह.भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे आयोजित केलेल्या हरिकिर्तन सोहळ्यात आपल्या कीर्तन सेवेदरम्यान काढले.


जळकोट (ता. तुळजापूर) येथील भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के व मित्र परिवाराच्या वतीने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर भव्य हरी किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या हरीकिर्तन सोहळ्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, समाज प्रबोधनकार व महाराष्ट्र भूषण ह .भ. प .निवृत्ती महाराज इंदुरीकर यानी हजारोंच्या उपस्थितीत तब्बल दोन तास हास्यविनोदात कीर्तन केले. 


या कीर्तना दरम्यान इंदुरीकर महाराजांनी आपण महाराष्ट्र फिरलो. परंतु महापुरुषांच्या एकत्रित जयंत्या कुठे साजरी झाल्याचे पाहिले नाही. पहिल्यांदाच गणेश सोनटक्के सर्व महापुरुषांच्या जयंती एकत्रित साजरी करताना पहात आहे.  हि काळाची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर, महम्मद पैगंबर, संत सेवालाल, संत गाडगेबाबा, संत रोहिदास, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, संत तुकाराम आदि १४ महापुरुषांच्या जयंती एकत्रित प्रतिमांना पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.


यावेळी आमदार राणाजगजितसिह  पाटील यांनी न्यायालयीन लढा लढून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप-२०२० मधला एकूण ५१० कोटी रुपये विमा मंजूर करून दिल्याबद्दल गणेश सोनटक्के व मित्र परिवाराच्यावतीने त्यांचे प्रतिनिधी मल्हार पाटील यांचा बैलगाडी प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. खचाखच भरलेल्या मैदानावर हजारो महिला ,पुरुष व युवक यांनी कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी केली होती. इंदुरीकर महाराजांनी तब्बल दोन तास कीर्तन सेवा केली. त्यांनी आपल्या कीर्तनात विज्ञाना बरोबर अध्यात्माचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले.कोरोना महामारीमुळे खूप मोठे नुकसान झाल्याचे सांगून, शेतीला जोडधंदा दिल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा. धर्म टिकवण्याचे खूप मोठे आव्हान यापुढे राहणार असल्याचे सांगितले.


यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे, पंचायत समिती सभापती सौ. रेणुका इंगोले, भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,  ॲड. दीपक आलुरे ,सिद्धेश्वर कोरे, दत्ता राजमाने, वैभव पाटील, माजी सरपंच तमनाप्पा माळगे, माजी उपसरपंच बंकटराव बेडगे, शिवाजी इंगोले, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले आदीसह हजारोच्या संख्येने श्रोते उपस्थित होते. शेवटी  ॲड. आशीष सोनटक्के यांनी आभार मानले.
 
Top