तुळजापूर दि१३ डॉ. सतीश महामुनी
येथिल श्री तुळजाभवानी मंदिर समोर भाविकांना त्रास देणाऱ्या लहान वयातील भिकाऱ्यांना महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कृती दलाने धडक कारवाई करून सहा बालकांना ताब्यात घेतले आहे.
तीर्थ क्षेत्र असणाऱ्या तुळजापूर येथे मंदिरासमोर गेल्या अनेक वर्षापासून लहान मुले आणि महिला मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना त्रास देऊन भीक मागतात. भाविकांच्या अंगाला झोंबाझोंबी करणे आणि हात पकडून भीक मागणे असे कृत्य केल्यामुळे तुळजापूर देवस्थानची बदनामी होत आहे. या विरोधात येथील समाजसेवक संजय कुमार बोंदर यांनी गेल्या चार वर्षापासून सतत पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण विभागाने पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, चाइल्ड लाइन उस्मानाबाद ,बाल कल्याण समिती, शिक्षण विभाग, उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने 13 मे रोजी सकाळी अकरा वाजता धडक कारवाई केली
अचानकपणे कारवाई केल्यामुळे तेथे मोठ्या संख्येने भीक मागणाऱ्या महिला आणि मुले यांनी पळून जाण्यासाठी धावाधाव केली. या धरपकड मध्ये पथकाच्या हातामध्ये केवळ सहा मुले लागली. यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे.
ताब्यात घेतलेल्या सहा अल्पवयीन मुलांमधून दोन मुलांना सोडून देण्यात आले. त्यामधील एक मुलगा बाहेर जाऊन दर्शनासाठी आलेला होता. त्याची खात्री पटवून त्याला परत पालकांच्या सुपूर्द केले आहे. यातील दुसरा मुलाच्या कुटुंबीयांनी संबंधित पथकाला मुलगा ताब्यात न देण्याची विनंती केली व तसे शपथपत्र सादर केले. एक मुलगी आपलं घर नळदुर्ग येथे दाखल केली आहे. उर्वरित तीन मुले उस्मानाबाद येथील निरीक्षण ग्रहांमध्ये ठेवण्यात आली आहेत.
उस्मानाबाद जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश, बालकल्याण समिती अध्यक्ष आश्रुबा कदम, पोलीस उपनिरीक्षक पवार, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. जाधव, नगरपरिषद प्रशासन प्रतिनिधी यांच्याकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. आठ दिवसापूर्वी आमदार संवाद मंच यांच्याकडून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी सुनील अंकुश यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
या कारवाईच्या निमित्ताने जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश यांनी आजची कारवाई ही अपुरीच झालेली आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्त आम्हाला दिला गेला पाहिजे. म्हणजे चांगली कारवाई होऊ शकेल असे मत व्यक्त केले . जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष आश्रुबा कदम यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे आज दिवसभर कृती दलाकडून धडक कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या अनेक कारवाया करण्याची कृती दलाची तयारी आहे.
समाजसेवक संजय कुमार बोंदर यांनी अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवाया केल्याशिवाय येथील भाविकांचा त्रास कमी होणार नाही. मंदिराची खूप मोठी बदनामी यामुळे होत आहे. सर्व खात्यांनी ही सामाजिक समस्या लक्षात घेऊन जलद गतीने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.