काटी , दि . ०३
तुळजापूर तालुक्यातील केमवाडीमध्ये एका तरुण शेतक-याचे मृत्यूदेह त्यांच्या विहिरीतच पायाला साडीच्या सहाय्याने मोठा दगड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण केमवाडी परिसरात खळबळ उडाली असून तामलवाडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील अतिशय कष्टाळू तरुण शेतकरी सुहास उर्फ राजु सुरेश काळे वय (22) वर्ष याचा मृतदेह त्याच्याच शेतातील विहिरीत पायाला साडीच्या सहाय्याने मोठा दगड बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मंगळवार दि. 31 रोजी घरची सर्व मंडळी नातेवाईकांच्या कार्यक्रमास परगावी गेले होते. परंतु सुहास उर्फ राजु शेतातील कामामुळे गेला नाही. रात्री उशिरापर्यंत सुहास घरी न आल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध केली. परंतु मंगळवारी सायंकाळपर्यंत आढळून आला नाही. शेतातील विहिरीकडे शोध घेतला असता त्याचे कपडे विहिरीच्या कडेला आढळून आले. त्यामुळे औरंगाबादहून पथक बोलावून गळाच्या सहाय्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांचा मृतदेह काढण्यात या पथकाला यश आले.
विशेष म्हणजे त्यांचे लग्न होऊन अवघे नऊच महिने झाले होते. या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी दुपारी बारा वाजता केमवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण केमवाडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणात तामलवाडी पोलीस ठाण्यात सुदर्शन सुरेश काळे यांच्या फिर्यादीनुसार भादवि 13/22 नुसार कलम 174 सीआरपीसी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत करीत आहेत.
साडीच्या सहाय्याने दगड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे हा प्रकार हत्या की आत्महत्या या बाबत चर्चेला उद्याण आले आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता तामलवाडी पोलीस ठाण्यात भादवि 13/22 कलम 174 सीआरपीसी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले. हत्या की आत्महत्या हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समजणार आहे.