काटी , दि. २९: उमाजी गायकवाड
शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडामुळे आमदारांसह आठ मंत्री गुवाहटीला गेले असल्याने व बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असताना तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील अंगणवाडीस तेलंगणाच्या महिला व बालविकास मंत्री सविता इंद्रा रेड्डी व शालेय शिक्षण मंत्री सत्यवती राठोड यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने अंगणवाडीच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजना व त्याची अंमलबजावणी त्यांनी जाणून घेतली व गरोदर माता व स्तनदा यांच्याशी संवाद साधून त्यांना देण्यात येत असलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. इतर राज्यातील महिला मंत्र्यांनी मंगरूळ सारख्या ग्रामीण भागातील अंगणवाडीस भेट दिल्याने जिल्हाभर या अंगणवाडीचे व येथील सेविका व त्यांच्या सहाय्यकाचे कौतुक केले जात आहे.
राज्यातील मंत्री बंडानंतर महाराष्ट्र राज्याबाहेर गुवाहाटीला गेले असताना अचानक तेलंगणा राज्यातील दोन महिला मंत्र्यांनी भेट दिल्याने व त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याबद्दल मंगरूळ गावात कुतूहलाचा विषय झाला आहे. या तेलंगणाच्या महिला मंत्र्याना अंगणवाडीत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजना व त्यांची अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती तुळजापूर पंचायत समितीमधील गट विकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, ,सरपंच विजयालक्ष्मी महेश डोंगरे,उपसरपंच गिरीश डोंगरे ,ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी करून दिली यावेळी गरोदर माता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.