अणदूर , दि. २९: श्रीकांत अणदूरकर

शिक्षक हा,शरीराने सेवानिवृत्त होतो, मनाने नाही, सेवानिवृत्तीनंतर  शिक्षकाने,शक्य असेल तेवढे आपले पवित्र ज्ञान दानाचे कार्य चालू ठेवावे. त्यातूनच सुदृढ समाज निर्माण होतो."असे उदगार अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे यांनी काढले.


तुळजापूर  तालुक्यातील  अणदुर  जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या वतीने येथील मुख्याध्यापक यशवंत बाबुराव मोकाशे आणि सह शिक्षिका प्रतिभा जयपाल सगरे ( कंदले) यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार,कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून  रामचंद्र  आलुरे हे बोलत होते, शालेय व्यवस्थापन समिती आणि अणदूर केंद्राच्या विशेष पुढाकारातून हा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमातील सत्कारमूर्तींनी विविध ठिकाणी जि. प.प्रा. शाळेमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले, त्याही ठिकाणच्या काही पालक व शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. 


प्रमुख पाहुणे म्हणून निलकंटेश्वर मठाचे मठाधिपती ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांच्या सान्निध्यात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती देवी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. व त्यानंतर सत्कार मूर्ती यशवंत मोकाशे यांचा सपत्नीक तर प्रतिभा सगरे यांचा शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, रामचंद्र आलूरे, बाबुराव  चव्हाण यांच्या हस्ते सहपतूनिक सत्कार करण्यात आला. 


यावेळी, पंचायत समिती सदस्या वैशाली मुळे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, माजी सरपंच धनराज मुळे, बालाजी मोकाशे,चेअरमन सिद्राम शेटे, पं. स.गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, विस्तार अधिकारी तात्यासाहेब माळी, ज्येष्ठ समाज सेवक डॉ.सिद्रामप्पा खजुरे, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी, शिक्षणतज्ज्ञ भगीरथ कुलकर्णी,मार्गदर्शक महादेवप्पा नरे,श्रीमंत मुळे, केंद्र प्रमुख रमेश राठोड, बाबुराव मुळे यांच्यासह शिक्षण संघटनेचे पदाधिकारी  यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळी बाबुराव चव्हाण, तात्यासाहेब माळी, डॉ.नागनाथ कुंभार, शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सहशिक्षिका संगीता पापडे, जळकोट येथील सेवानिवृत्त शिक्षक एस.टी.पोतदार, श्रीमती आवटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी के राठोड यांनी तर  सूत्रसंचालन प्रा प्रसन्न कंदले यांनी केले. शेवटी प्रभारी मुख्याध्यापिका संगीता देशमुख यांनी आभार मानले.
 
Top