चिवरी , दि . २३ : राजगुरु साखरे :
कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी, अवकाळी ,पडलेलले बाजार भाव या निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी संकटाच्या मालिकेने त्रस्त आहेत, परंतु या संकटावर मात करीत तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील प्रगतशील शेतकरी पोपटराव दत्तात्रय पाटील यांनी केळी पिकांची परदेशात निर्यात करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत, त्यामुळे शेती पिकत नाही, शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चिवरीचे प्रगतशील शेतकरी तथा निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील यांनी चांगला आदर्श घालून दिला आहे.
येथील शेतकरी पाटील यांनी पाच एकर क्षेत्रावर एक वर्षापूर्वी जैन टिश्यू कल्चर या जातीची निवड करून केळी लागवड केली , योग्य खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, आवश्यकतेप्रमाणे विद्राव्य खते वापरून , घडाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केळफुल निसवल्यानंतर आंतरप्रवाही कीडनाशकाचा वापर करून दर्जेदार औषधांचा वापर , खते मशागत यासह आदींची निगा राखल्याने चांगल्या प्रतीचे केळी उत्पादन निघू लागले आहे,
आजघडीला एकरी केळीचे ३५ टन गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊन प्रति क्विंटल दोन हजार रुपये दराने सौदी अरेबिया या देशात निर्यात होत आहे, साधारणता सरासरी एका घडाचे वजन चाळीस किलो मिळत असून या अगोदरही पाटील यांनी द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर उत्पादन घेऊन विक्रम केला होता, त्यापाठोपाठ आता केळी उत्पादनामध्येही त्यांनी भरघोस उत्पादन घेत आहेत एकंदरीत श्री पाटील यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन, करून उत्पादित केळी सातासमुद्रापार पाठवण्यात त्यांना यश आले आहे.