काटी  दि.२१:  

अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी शाळेत सकाळी 7:15 ते 8:15 वा.पर्यंत योगासनांच्या प्रात्यक्षिकासह योगदिन  साजरा करण्यात आला.


यावेळी मुक्त शारीरिक हालचालीं सोबत उभ्या स्थितीतील आसने की ज्यामध्ये ताडासन, वृक्षासन,पादहस्तासन, अर्ध- चक्रासन, त्रिकोणासन त्यानंतर बैठ्या स्थितीतील आसने यामध्ये भद्रासन,वज्रासन,अर्ध उष्ट्रासन,उष्ट्रासन, पद्मासन व वक्रासन त्यानंतर पाठीवरील आसनांमध्ये सेतुबंधासन, पवनमुक्तासन तर पोटावर झोपून करावयाच्या आसनांमध्ये भुजंगासन, मकरासन, शलभासन इत्यादी आसने प्रात्यक्षिकासह घेण्यात आली. 

 त्यानंतर कपालभाती, भ्रामरी प्राणायाम व ध्यान घेऊन योगसाधनेची सांगता करण्यात आली.  
  वजनात घट, सशक्त व लवचिक शरीर,तजेलदार त्वचा, शांत व प्रसन्न मन, उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपुरतीच मर्यादित आहे, असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो. कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्या सहज लक्षात येतात; परंतु मन, श्वासोच्छवास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. मन,शरीर व श्‍वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी व सर्वार्थाने सफल होतो; असे योगासनाचे महत्व योग शिक्षक श्री शांताराम कुंभार यांनी विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित तरूण यांना पटवून दिले.                   

यावेळी योग शिक्षक म्हणून शांताराम कुंभार,हर्षवर्धन माळी यांचे समवेत नानासाहेब कोळी, शहाजी कोळी,अनिता माने व कोरबू मँडम उपस्थित होते.शाळेतील इ.1ली ते 8 वी.पर्यंतची एकूण 174 विद्यार्थी व 12 तरुणांनी योगसाधनेत सहभाग नोंदविला.
 
Top