तुळजापूर , दि . ०४ 

 ग्रामीण भागात शेतीपंपासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक दुरुस्तीसाठी लागणारे विविध साहित्य वीज वितरण कंपनीकडून मिळाले पाहिजे, याचा खर्च शेतकऱ्यांना  करण्यास भाग पाडू नये अशी मागणी आमदार संवाद मंच तुळजापूर  यांच्या वतीने करण्यात आली आहे.


आमदार संवाद मंच तुळजापूर यांच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुळजापूर येथील उपकार्यकारी अधिकारी एस. व्ही. घोदे यांना वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे आमदार संवाद मंच शिष्टमंडळाने या प्रश्नाच्या अनुषंगाने निवेदन दिले आहे. या प्रश्नावर सदस्य बबनराव जाधव यांनी विविध उदाहरणे देऊन शेतकऱ्यावर होणारा अन्याय अधिकाऱ्यांसोबत मांडला तेव्हा अधिकाऱ्यांनी या बाबी वास्तव्य असल्याची कबुली दिली आहे.

वीज ग्राहकांना चुकीचे बिल तात्काळ दुरुस्त करून मिळावे आणि तुळजापूर कार्यालयात रिक्त असणार्‍या पदावरील अभियंत्यांची भरती करण्यात यावी, या दोन मागण्या देखील या निवेदनात केलेल्या आहेत. वीज वितरण कंपनीच्या कामांमध्ये लाईनमन हा महत्त्वाचा घटक असताना लाईनमन यांची नियुक्तीच्या जागेवर दिलेले नाही त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास होतो आहे,या सर्व लाईनमन कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुत्तीच्या जागी राहण्यासाठी आदेश काढण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली . 

याशिवाय कंत्राटी लाईनमन तुळजापूर तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ग्राहकांना पैसे मागण्याचे प्रकार समोर आले आहेत . ग्राहकांनी पैसे न दिल्यास हे लाईनमन आपण रजेवर असल्याचे कारण सांगतात . या प्रकारामुळे वीज वितरण कंपनीची बदनामी जनतेमध्ये होत आहे. लोकांना याचा त्रास होतो आहे.  याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. असा मुद्दा उपस्थित करून तात्काळ आपल्या कामामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

तुळजापूर तालुक्यात कार्यरत असणारे लाईनमन आणि कंत्राटी लाईनमन यांची स्वतंत्र यादी गाव आणि नियुक्ती स्थानासह कार्यालयात प्रसिद्ध करावी,  जेणेकरून यामधील वास्तव जनतेसमोर येईल, त्याची प्रत आमदार संवाद मंचाला द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. या सूचनांचे १५  दिवसात निराकरण न केल्यास आमदार संवाद मंच रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. 

आमदार संवाद मंचाचे अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, सदस्य व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम पवार,  सदस्य व माजी मंत्री मधुकराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक बबनराव जाधव, संपर्क संस्थेचे जिल्हा समन्वयक अनिल आगलावे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे यांच्यासह इतर सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top