तुळजापूर दि २८ : डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यातील अनेक वर्षापासून राजकारण करणाऱ्या ग्रामीण भागातील नेतृत्वाला आरक्षणाच्या सोडतीनंतर जबरदस्त धक्का बसला आहे, सर्वसाधारण पुरुष गटासाठी असलेले अनेक दिग्गज उमेदवार यांना सर्वसाधारण पुरुष ऐवजी सर्वसाधारण महिला असे उमेदवार द्यावे लागणार आहेत.
तालुक्याच्या राजकारणात पुरुषांच्या राजकारणाला धक्का देणारे हे आरक्षण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेचे नेतृत्व करण्यासाठी महिला अग्रभागी दिसतील असे चित्र आहे. निवडणुकीचा वाढता खर्च लक्षात घेता जिल्हा परिषदेसाठी अनेक उमेदवार राजकीय ताकतवार असून देखील खर्चाच्या अनुमानामुळे निवडणुकीपासून दूर राहण्याचा पवित्रा घेतलेले होते. अशा उमेदवारांना हे आरक्षण म्हणजे सुंठी वाचून खोकला दुरुस्त झाल्याचे आहे.
जिल्हा परिषद मतदार संघ निहाय अनुक्रमे सिंदफळ ,अणदुर ,मंगरूळ, खुदावाडी, काटगाव या ठिकाणी सर्वसाधारण महिला उमेदवार आरक्षण आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी काक्रंबा तामलवाडी येथे आरक्षण आहे नागरिकांचा मागासवर्ग महिला नांदगाव मतदारसंघात आहे. अनुसूचित जाती मतदारसंघासाठी जळकोट आणि काठी हे दोन मातब्बर मतदारसंघ असणार आहेत.
तुळजापूर पंचायत समिती गटाचे आरक्षण घोषणा झाल्यानंतर सर्वसाधारण गटामधून आरळी बुद्रुक, मंगरूळ, चिवरी ,सावरगाव ,येवती हंगरगां नळ, खुदावाडी येथे सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवारांना निवडणूक लढवता येणार आहे. अपसिंगा सलगरा दिवटी किलज वडगाव काटी तामलवाड येथे महिलासाठी सर्वसाधारण आरक्षण मिळाले आहेत .
तालुक्यातील काँग्रेसचे प्राबल्य असणारा काटगाव मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. महिला अनुसूचित जातीसाठी काटी व केशेगाव असे आरक्षण आहे .जळकोट व काक्रंबा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण आहे. नांदगाव सिंदफळ व अणदुर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गट असे आरक्षण मिळाले आहे.
सिंदफळ येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील यांचा मतदारसंघ महिला झालेला आहे. मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अस्मिता कांबळे यांना मतदारसंघ बदलून निवडणूक लढवावी लागणार आहे. आमदार राणाजगजितसिह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यात विजय संपादन केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांना स्वतः निवडणूक न लढवता इतरांना निवडून आणण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे असे चित्र आहे.