चिवरी, दि .२२:राजगुरू साखरे: 

शेतकरी बांधवांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला येत्या शुक्रवारी दि.२६ रोजी  सर्जा - राजाचा सण आला आहे .



त्यामुळे या सणादिवशी बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या झुली, शिंगे रंगवण्यासाठी वारणीस, रंगीबेरंगी गोंडे, घुंगराची चंचाळे, बाशिंग ,पितळी शेंबी, मोरक्या, कासरे आदी  साहित्य खरेदीसाठी बाजारात आली आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा 25 ते 30 टक्के साहित्याची दर वाढ झाल्यामुळे  बळीराजाच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. गत दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध होते. त्यामुळे दोन वर्षे शेतकऱ्यांनी शेतातच सण साजरा केला होता ,त्यामुळे यंदा बळीराजा आपल्या साथीदाराच्या उत्सवासाठी सज्ज झाला आहे. 




यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे, मात्र मागील महिनाभरापासून सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, या निसर्गाच्या  अकृपेवर मात करीत मोठ्या हिमतीने शेतकरी बांधव आपल्या लाडक्या सर्जा राजाच्या साहित्य खरेदी करून बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे  शेतकरी बांधवातून बोलले जात आहे.

 नळदुर्ग येथील आठवडी बाजारातील सर्जा राजाच्या साजाने थाटलेली दुकाने रविवारी दिसुन आले.
 
Top