चिवरी, दि. २७ : राजगुरू साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी, येवती ,आरळी, उमरगा चिवरी, काळेगाव, चिंचोली, बसवंतवडी, बीजनवाडी आदी परिसरात शेतकऱ्यांनी बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध असल्यामुळे शेतकऱ्यांनी बैलपोळा सण शेतातच साजरा केला होता. यंदा मात्र सर्व निर्बंध हटवल्याने बळीराजांनी दुपारपासूनच मारुती मंदिर, महादेव मंदिरापर्यंत बैलांच्या वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बॅन्जो, हलगी, ढोल, डॉल्बी आदि वाद्याच्या तालावर ठेका धरला होता, तसेच हनुमान मंदिर, महादेव मंदिराला प्रदक्षिणा घालून बैलांना शेतकरी आपल्या घरी नेऊन गोडधोड नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आल्या.
आसमानी सुलतानी संकटामुळे बळीराजा हतबल झाला असला तरी आपल्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा सण माञ प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.