मुरूम, ता. उमरगा, दि. ११ :
गणेश विसर्जनासाठी व्यस्त असलेल्या मुरूम पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस लाईन येथे स्थापना करण्यात आलेल्या गणेशाची शनिवारी (ता.१०) रोजी पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात गणेश विसर्जन करण्यात आले.
शहरातून पोलीस ठाणे ते महात्मा बसवेश्वर चौक, साठे चौक, अशोक चौक, हनुमान चौक, गांधी चौक, सुभाष चौक, किसान चौक या मार्गावर पारंपारिक वाद्य वाजवत मिरवणूक यंदा जल्लोषात साजरी करण्यात आली. किसान चौकातील किसान गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेशाचे पूजन करून शुक्रवारी (ता.९) रोजीच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्तव्य बजावून थकलेल्या व चोख बंदोबस्त ठेवून शांततेने मिरवणूक पार पडलेल्या पोलीस प्रशासनांकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पोलीस कर्मचारी थकवा विसरून बाप्पाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्याच्या तालावर नृत्य सादर करत बाप्पाना किसान चौकातील महादेव मंदिर परिसरातील ऐतिहासिक विहिरीत विधिवत पूजा करून निरोप देण्यात आला.
पहिल्यांदाच पोलीस वसाहतीतील श्री गणेश मिरवणुक शहरातून काढल्याने शहरातील नागरिकांचा आकर्षणाचा विषय ठरला. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप, सपोनि पवन इंगळे सह पोलीस कर्मचारी, होमगार्ड जवान व शहरातील नागरिक मिरवणूकीत मोठया संख्येने सहभागी झाले होते.