मंगरूळ, दि.२५

  प्रणिता उमाकांत मिटकर यांना महाराष्ट्र व छत्तीसगढ येथे कार्यरत असणाऱ्या धनेश्वरी शिक्षण समूहाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रणिता मिटकर या एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा मंगरुळ ता. तुळजापूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षकी पेशात येण्याअगोदर त्यांनी स्वतःला भटके-विमुक्त विकास परिषदेच्या सामाजिक कार्याशी जोडून घेतले होते.संघटनेने सुरुवातीला त्यांना पालावरची शाळा (संस्कार केंद्र) या अभिनव उपक्रमात दोन वर्ष पूर्णवेळ काम करण्याची संधी दिली.या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या सोयीनुसार सुरू होणारी, विना भिंतीची शाळा,पाटी-पुस्तक फळा यांच्या आधाराशिवाय ही शाळा चालते,दगड,गोटे,फुले,पाने ही शैक्षणिक सामग्री असते.

सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकानेही या कार्याची दखल घेतली आहे.या क्षेत्रातील योगदान पाहून संस्थेने त्यांना एकलव्य प्राथमिक आश्रम शाळेत सहशिक्षिका म्हणून संधी दिली.त्यानंतर त्यांनी वंचित,दुर्लक्षित समाजाच्या मुलांसाठी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग राबवले. त्यांचा एक विशेष प्रयोग म्हणजे “भाषा प्रयोगशाळा”यात भटक्या-विमुक्तांच्या भाषा मराठीत भाषांतरित करून त्यांनी नवीन पद्धत शिक्षणात आणल्याने शाळेतील गळतीचे प्रमाण कमी झाले तसेच मुलांना त्यांच्या शिक्षणात गोडी निर्माण झाली.

यासोबतच त्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा महिला व बाल संस्कार प्रमुख म्हणून काम पाहतात,दासबोधाच्या अभ्यासिका म्हणून किशोरी विकास मेळावे व महिलांमध्ये जनजागृती करतात, त्याशिवाय वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकल महिलांमध्ये दखल घेण्या योग्य काम उभे केले आहे.

या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ती,महिला भूषण,नारी गौरव,आदर्श माता,आदर्श शिक्षिका इ.पुरस्कारांनी गौरविले आहे .

यासाठी जिल्ह्यातील वीस उपक्रमशील शिक्षकांची निवड केली होती.सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त कार्यकारी मुख्याधिकारी श्री.इंद्रजीत देशमुख, विभागीय कार्यालय लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे.प्रमुख उपस्थिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद चे प्राचार्य.डॉ.दयानंद जटनूरे, शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.बाळकृष्ण तांबारे,राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.धनंजय पाटील,उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रसेन देशमुख,जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.धनंजय रणदिवे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा डॅा.प्रतापसिंह पाटील यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम आर्यन फंक्शन हॉल,उस्मानाबाद येथे 25 सप्टेंबर 22 रोजी संपन्न झाला
 
Top