उमरगा,दि.२७: लक्ष्मण पवार
नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने अंतुबळी सांस्कृतिक सभागृहासमोर सोमवारी मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले.
या अन्नछत्राचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा अन्नछत्राचे प्रमुख कैलास शिंदे, अशोक जोशी महाराज, माजी नगरसेवक शरणप्पा घोडके, माजी नगरसेवक बाबुराव सगर यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी जात असतात. आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याची सीमा संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याची सीमा सुरू होते. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आंध्र व कर्नाटकातील हजारो भाविक या मार्गावरून दरवर्षी पायी जातात. पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी शहरातील तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने गेल्या २२ वर्षापासून मोफत अन्नछत्र सुरू करण्यात येते. अन्नछत्रात फराळा बरोबरच जेवणाची उत्तम सोय मंडळाच्यावतीने केली जाते. नवरात्र उत्सव काळात लाखोंच्यावर भाविक येथील अन्नछत्राचा लाभ घेतात.
सोमवारी सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्र कार्यक्रमाप्रसंगी शंतनु सगर, अशोक जोशी महाराज, गोपाळ घोडके, राजेश स्वामी, लक्ष्मण पवार, अनंत पाटील, मंगेश गायकवाड, कैलास स्वामी, संकेत नागणे, बसवराज घोडके, दिलीप माने, मल्लिणाथ कलशेट्टी, आदींची उपस्थिती होती.